नवी दिल्ली : वृत्तसंस्था
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे आज (दि. ४) दुःखद निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. त्यांचे पुत्र आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर भावनिक पोस्ट लिहून या वृत्ताला दुजोरा दिला.

‘दिशोम गुरुजी’ या नावाने प्रसिद्ध असलेले शिबू सोरेन हे झारखंडच्या राजकारणातील एक मोठे आणि आदरणीय व्यक्तिमत्व होते. ते गेल्या ३८ वर्षांपासून झारखंड मुक्ती मोर्चाचे प्रमुख नेते होते. पक्षाचे संस्थापक संरक्षक म्हणून त्यांची ओळख होती आणि झारखंडच्या राजकारणात त्यांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे मानले जात होते. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने अनेक राजकीय लढाया जिंकल्या. त्यांच्या निधनाने केवळ झारखंड मुक्ती मोर्चाचेच नव्हे, तर संपूर्ण राज्याच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.



