पुणे : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून पुणे येथील राजकारण चांगलेच पेटले असताना आता शिवसेना शिंदे गटाचे पुणे महानगरप्रमुख आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणात आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. जैन बोर्डिंगच्या मालमत्तेच्या व्यवहाराची चौकशी करून तो रद्द करावा, तसेच केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा राज्यमंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी या पत्रातून केली आहे. शिवाय हा व्यवहार रद्द होईपर्यंत आपण 27 ऑक्टोबरपासून जैन बोर्डिंग येथे बेमुदत धरणे आंदोलनात बसणार असल्याचे धंगेकर यांनी जाहीर केले आहे.

रवींद्र धंगेकर यांनी पंतप्रधानांना पाठवलेल्या या पत्राची प्रत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही पाठवली आहे. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली.
रवींद्र धंगेकरांची पोस्ट जशीच्या तशी…
तमाम पुणेकरांना मी एका गोष्टीची माहिती देऊ इच्छितो, आज आपल्या सर्वांच्या वतीने मी जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द व्हावा व प्रकरणाची कठोर चौकशी व्हावी, यासाठी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे विनंती करत आहे. तसेच २७ ऑक्टोबर २०२५ पासून हा व्यवहार रद्द होईपर्यंत मी तमाम पुणेकरांसह जैन बोर्डींग येथे बेमुदत धरणे आंदोलनास बसत आहे.
आजपर्यंतच्या गेल्या अठरा दिवसांच्या संपूर्ण संघर्षात माझ्यासह अनेक लोकांनी, अनेक वेळा या गोष्टीचे प्रत्यक्ष प्रत्यक्ष पुरावे दिले की, व्यवहारातील सर्वच व्यक्ती व संस्था या श्री.मुरलीधर मोहोळ यांच्या संबंधित आहेत. आज मी या पत्र्यामध्ये देखील आपल्या सर्वांच्या माहितीसाठी या संपूर्ण घटनेचा घटनाक्रम देत आहेत.
जैन बोर्डिंग चा व्यवहार रद्द होण्याबरोबरच समाजातील मंदिरे व देवस्थानच्या जागा हडप करणाऱ्या टोळीवर कठोर कारवाई व्हावी, यासाठी या प्रकरणाची निपक्ष:पाती चौकशी होणे गरजेचे आहे. ही मी निपक्ष:पाती चौकशी तेव्हा शक्य आहे जेव्हा सदर प्रकरणातील मुरलीधर मोहोळ हे आपल्या पदाचा राजीनामा देतील. कारण त्यांच्या केंद्रीय मंत्रीपदाच्या प्रभावाखालीच हा इतका मोठा गैरव्यवहार घडला आहे. त्यामुळे ही चौकशी होत असताना देखील त्यांनी मंत्रीपदावर राहणे योग्य नाही. त्यामुळे मी आज मुरलीधर मोहोळ यांच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्याची मागणी करत आहे.
आज माननीय पंतप्रधानांसह ,देशाचे गृह तथा सहकारमंत्री, राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांना देखील आपण या पत्राच्या प्रती पाठवत आहोत.त्यांनी या प्रकरणात लक्ष घालून तातडीने हा व्यवहार आपल्या विशेष अधिकारातून रद्द करावा व या प्रकरणाची कठोर चौकशी होईपर्यंत श्री. मुरलीधर मोहोळ यांचा राज्यमंत्री पदाचा राजीनामा घ्यावा ,अशी मागणी मी करत आहे.



