नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील मध्य प्रदेशातील नर्मदापुरम जिल्ह्यातील इटारसी येथील रहिवासी असलेल्या आरिफ खान चिश्ती या मुस्लीम तरुणाने संत प्रेमानंद महाराज यांना आपली किडनी दान करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आरिफने संत प्रेमानंद महाराजांना पत्र लिहून आपली भावना मांडली असून, या निर्णयामुळे सोशल मीडियावर त्याचे कौतुक होत आहे.

आरिफ खान चिश्ती हा इटारसी (नर्मदापुरम, मध्य प्रदेश) येथील न्यासा कॉलनीत राहणारा तरुण आहे. बारावीपर्यंत शिक्षण घेतलेला आरिफ ऑनलाइन नोकरी करतो. तो नियमितपणे संत प्रेमानंद महाराजांचे प्रवचन ऐकतो आणि त्यांच्या साधेपणाने तसेच विचारांनी प्रभावित झाला आहे. आरिफच्या कुटुंबात त्याचे वडील, पत्नी आणि तीन भाऊ असून, त्याच्या या निर्णयाला कुटुंबीयांनी पूर्ण पाठिंबा दिला आहे.
दिनांक 20 ऑगस्ट 2025 रोजी लिहिलेल्या पत्रात आरिफने म्हटले आहे, “मी आरिफ खान चिश्ती, न्यासा कॉलनी, इटारसी, नर्मदापुरम येथील रहिवासी आहे. तुमचे साधे आचरण आणि विचार पाहून मला खूप प्रेरणा मिळते. तुमच्या आरोग्याची मला काळजी वाटते. सोशल मीडियावरून तुमच्या किडनीच्या समस्येबाबत माहिती मिळाली. तुम्ही हिंदू-मुस्लिम ऐक्याचे जिवंत प्रतीक आहात. म्हणूनच मी स्वेच्छेने माझी किडनी दान करण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या द्वेषपूर्ण वातावरणात तुमच्यासारखे संत समाजाला दिशा देणारे आहेत. कृपया माझी ही छोटीशी भेट स्वीकारावी.”
आरिफच्या या उदार आणि मानवतावादी निर्णयाचे सोशल मिडियावर सर्वत्र कौतुक होत आहे. अनेकांनी त्याच्या या कृतीला हिंदू-मुस्लिम ऐक्याचे उत्तम उदाहरण मानले आहे. त्याच्या या पवित्र हेतूने समाजात सकारात्मक संदेश पसरवला आहे. आरिफ खान चिश्ती याच्या या निःस्वार्थ भावनेने संत प्रेमानंद महाराजांचे अनुयायी आणि सामान्य नागरिकांमध्येही आदर निर्माण झाला आहे. ही घटना समाजातील एकता आणि प्रेमाचे प्रतीक बनली आहे.



