Home » जळगाव » एमआयडीसीतील गोडाऊन फोडणारी टोळी अटकेत !

एमआयडीसीतील गोडाऊन फोडणारी टोळी अटकेत !

जळगाव :  प्रतिनिधी

एमआयडीसी परिसरातील गोडाऊन फोडून ८ लाख ३५ हजार रुपये किंमतीचा माल चोरी करणाऱ्या टोळीला एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत जेरबंद केले आहे. या कारवाईत चोरीचा सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसीतील एम सेक्टर २११/२ येथे अतुल विश्वनाथ मुळे यांच्या मालकीची ‘श्री प्रभु डिस्ट्रीब्युटर्स’ ही कंपनी आहे. ही कंपनी जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांत रामबंधु मसाले कंपनीची डीलरशिप आहे . २५ मार्च २०२५ रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी गोडाऊनचे शटर तोडून आत प्रवेश करत ७१ गोण्या मसाल्यांचा साठा चोरला. या मालाची किंमत ८ लाख ३५ हजार रुपये आहे. घटनेची माहिती २७ मार्च रोजी अतुल मुळे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी आणि अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी एमआयडीसी परिसरातील चोरीच्या घटनांवर अंकुश ठेवण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप पाटील यांनी गुन्हे शोध पथकाला तपासाचे आदेश दिले. पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके, पोहेकॉ राहुल रगडे, गणेश ठाकरे, विशाल कोळी, सिद्धेश्वर डापकर आणि रतन गिते यांच्या पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता,

आरोपींनी ओळख लपवण्यासाठी तोंडाला रुमाल बांधून ईको कारचा वापर करत चोरी केल्याचे उघड झाले. तांत्रिक विश्लेषण आणि फुटेजच्या आधारे पोलिसांनी चोरीत वापरलेले वाहन आणि आरोपींची ओळख पटवली. यात मुख्य आरोपी अनिल रमेश पाटील (रा. मिल कॉलनी, खडका, ता. भुसावळ) असल्याचे समोर आले. तो फिर्यादी अतुल मुळे यांच्याकडे मागील १५ वर्षांपासून चालक म्हणून कार्यरत होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली देत आपल्या साथीदारांची नावे उघड केली. या कारवाईत पोलिसांनी सर्व चोरीचा माल जप्त केला असून, पुढील तपास सुरू आहे. या यशस्वी कारवाईमुळे एमआयडीसी परिसरातील व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला असून, पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे.

 

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *