मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गंगा नदीच्या प्रदूषणावर गुढीपाडवा मेळाव्यातून केंद्र सरकारवर टीका केली होती. मात्र त्यांच्या त्या विधानावरून आता राजकारण होताना पाहायला मिळत आहे. “गंगाजल शुद्धच आहे पण काहींच्या विचारांचे काय?” असा सवाल करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून राज ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांनी हे बॅनर लावले आहे. महत्त्वाचे म्हणजे याच मतदारसंघातून राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी सदा सरवणकर यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवली होती.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे नेते सदा सरवणकर यांनी समाधान सरवणकर यांच्या माध्यमातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर कथितपणे बोचरी टीका करणाऱ्या एका बॅनरवरून मनसे चांगलीच संतप्त झाली आहे. या बॅनरला एकनाथ शिंदे यांची मान्यता आहे का? असा खडा सवाल मनसेने यासंबंधी उपस्थित केला आहे. तसेच हे बॅनर देखील काढून टाकले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कुंभावरील वक्तव्याची शिवसेना शिंदे यांनी खिल्ली उडवली आहे. शिवसेनेचे युवा अधिकारी समाधान सरवणकर यांनी शिवसेना भवनासमोर एक मोठा होर्डिंग लावला असून, त्यावर ‘गंगेचे पाणी शुद्ध आहे, पण तुमचे विचार शुद्ध आहेत का?’ असा प्रश्न विचारला आहे. वास्तविक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर कुंभमेळ्यात गंगा नदीतील प्रदूषित पाण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. हे पाणी शुद्ध समजून पिणाऱ्यांची एक प्रकारे राज ठाकरेंनी खिल्ली उडवली होती. आता दादर येथील शिवसेना शिंदे गटाचे नेते सदा सरवणकर यांच्या मुलाने या मुद्द्यावरून राज ठाकरेंना आव्हान दिले आहे.
144 वर्षांनी आलेल्या दिव्य महाकुंभाचा ऐतिहासिक सोहळा! जगभरातील 60 कोटींहून अधिक हिंदू बांधवांनी त्रिवेणी संगमात पवित्र स्नान करून अखंड हिंदू एकात्मतेचा जागतिक संदेश दिला! हे केवळ श्रद्धेचे नव्हे, तर हिंदू संस्कृतीच्या गौरवशाली भव्यतेचे जिवंत प्रतीक आहे. हा क्षण अभिमानाचा, हा क्षण गौरवाचा, हा क्षण हिंद एकजुटीचा. हर हर गंगे! नमामी गंगे! गंगाजल शुद्धच आहे पण काहींच्या विचारांचे काय?” असा खोचक सवाल शिवसेनेच्या या बॅनरमधून विचारण्यात आला आहे.



