जळगाव : प्रतिनिधी
एमआयडीसी पोलीस स्टेशनचे निरीक्षक बबन आव्हाड यांना गोपनीय माहिती मिळाली की, जळगाव शहरातील मच्छीबाजार, तांबापुरा परिसरात एका घरामध्ये मोठ्या प्रमाणात गांजा साठवून त्याची बेकायदेशीर विक्री केली जात आहे. माहिती मिळताच त्यांनी तत्काळ कारवाईचे आदेश देत एक विशेष पथक तयार केले. पोलीस निरीक्षक आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. अनिल वाघ, पोउपनि. राहुल तायडे, पो.उपनि. चंद्रकांत धनके, पोहेकॉ. किरण चौधरी, पोहेकॉ. प्रमोद लाडवंजारी, पो.काँ. गणेश ठाकरे, पोकॉ. किरण पाटील, पोकॉ. नितीन ठाकूर, पोकॉ. राहुल घेटे, पोकॉ. योगेश घुगे यांनी या विशेष पथकात सहभाग घेतला.

सदर पथकाने तांबापुरा परिसरात संशयित इसमाचा शोध घेतला असता, मिळालेल्या गुप्त माहितीनुसार मच्छीबाजार येथील एका घरात संशयित असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी चारही बाजूंनी सापळा रचून कारवाई सुरू केली. घराबाहेरून आवाज दिल्यानंतर एक इसम बाहेर आला. त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने आपले नाव मेहमुद शेख मेहबुब (वय ५९, व्यवसाय – मजुरी, रा. मच्छीबाजार, तांबापुरा, जळगाव) असे सांगितले. त्याच्याकडे विचारपूस केल्यानंतर पोलिसांनी घराची तपासणी केली असता, दोन गोण्यांमध्ये लपवलेला सुमारे १५ किलो ५२५ ग्रॅम गांजा सापडला. या गांजाची एकूण किंमत रु. ९३,१५०/- इतकी आहे. सदर कारवाईत शासकीय पंच, वजनकाटा धारक, तसेच फॉरेन्सिक व्हॅन घटनास्थळी पाचारण करण्यात आली होती.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल गणेश ठाकरे यांच्या फिर्यादीवरून एनडीपीएस कायदा कलम ८(क), २०(ब)(II)(ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मेहमुद शेख मेहबुब याला २ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली असून, त्याला ४ सप्टेंबर २०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास पोउपनि. राहुल तायडे आणि पोकॉ. चेतन पाटील करीत आहेत.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. महेश्वर रेड्डी (भा.पो.से.), मा. अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि मा. उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.



