मुंबई : वृत्तसंस्था
छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा युनोस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे. यात महाराष्ट्रातील 11 किल्ल्यांसह तामिळनाडूतील एका किल्ल्याचा समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करून माहिती दिली आहे.

जागतिक वारसास्थळ यादीत समाविष्ट 12 किल्ले
- रायगड
- राजगड
- प्रतापगड
- पन्हाळा
- शिवनेरी
- लोहगड
- साल्हेर
- सिंधुदुर्ग
- विजयदुर्ग
- सुवर्णदुर्ग
- खांदेरी
- जिंजी
आपल्या सर्वांकरिता ऐतिहासिक अभिमानास्पद आणि गौरवशाली क्षण आहे. आपले आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा यादीत स्थान देण्याचा प्रस्ताव मंजूर केलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे 12 किल्ले युनेस्कोकरिता नॉमिनेट केले होते. युनेस्कोच्या या संपूर्ण प्रक्रियेमध्ये 20 वेगवेगळ्या देशांना मतदान करायचे होते. या 20 ही देशांनी छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक वारसा यादीत घेण्याकरिता मतदान केले आणि एकमताने हे किल्ले आता जागतिक वारसा यादीत आलेले आहेत. महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी, हिंदूस्थानकरिता, छत्रपती शिवरायांना मानणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकरता ही एक अतिशय आनंदाची गोष्ट असून गौरवाचा क्षण आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
महाराष्ट्र सरकारने पाठवलेला आपला प्रस्ताव सर्व अडथळे पार करून आज पॅरिसमधील बैठकीमध्ये जागतिक युनेस्कोचे सदस्य असलेल्या सर्व राष्ट्रांनी किल्ल्यांचे महत्त्व मान्य केले, त्याला समर्थन दिले आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 गड-किल्ल्यांना जागतिक वारसाचे मानांकन मिळाले. केंद्र सरकारच्या पाठिंब्याने, भारतीय पुरातत्त्व विभाग, संस्कृती मंत्रालय आणि आमचे सांस्कृतिक विभाग आणि युनेस्कोमधील भारतीय प्रतिनिधींच्या संयुक्त प्रयत्नांमुळे हा जागतिक सन्मान साकार झाला आहे. ही फक्त गड किल्ल्यांची नाव नाहीत, तर स्वराज्याच्या ध्येयासाठी महाराजांनी उभारलेल्या स्थापत्यशास्त्राची शिखरं आहेत. या दुर्गरचना म्हणजे युद्धनीती, मुत्सद्दीपणा आणि रक्षणशक्ती यांचे अभूतपूर्व उदाहरण आहेत. हा ऐतिहासिक आणि गौरवशाली क्षण आपल्या सर्वांसाठीच अभिमानाचा आहे, असे राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार म्हणाले.



