Home » ताज्या » मोठी बातमी : एसटी महामंडळात होणार तब्बल १७ हजार जागांची भरती !

मोठी बातमी : एसटी महामंडळात होणार तब्बल १७ हजार जागांची भरती !

मुंबई : वृत्तसंस्था

सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असणाऱ्या एसटी महामंडळात तब्बल 17 हजार जागांची भरती होणार आहे. या जागा चालक व सहाय्यकाच्या आहेत. त्यासाठी स्वतः एसटीच पात्र उमेदवारांना प्रशिक्षण देणार आहे. विशेषतः या पदासांसाठी दरमहा 30 हजार रुपयांपर्यंतचे मानधन दिले जाणार आहे. त्यामुळे नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी ही एक मोठी संधी असल्याचे सांगितले जात आहे.

राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी वरील नोकरभरतीची माहिती दिली. ते म्हणाले, भविष्यात येणाऱ्या 8 हजार नवीन बसेससाठी मनुष्यबळाची मोठी आवश्यकता आहे. त्यामुळे चालक व सहाय्यक या पदांसाठी कंत्राटी पद्धतीने 17,450 जागांवर भरती केली जाईल. यासंबंधीची निविदा प्रक्रिया 2 ऑक्टोबर रोजी सुरू होईल. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून राज्यातील हजारो बेरोजगार तरुण-तरुणींना रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यांना दरमहा 30 हजार रुपये एवढे वेतन मिळणार आहे. त्यामुळे होतकरू तरुण-तरुणींनी या संधीचा पुरेपूर फायदा घ्यावा, असे ते म्हणाले.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या 300 व्या संचालक मंडळाच्या बैठकीत भरतीचा हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार, बससेवा सुरुळीत सुरू ठेवण्यासाठी आवश्यक असलेले चालक व सहाय्यक मनुष्यबळ भाडेतत्त्वावर (कंत्राटी पद्धत) 3 वर्षांच्या कालावधीसाठी घेण्यासाठी ई-निविदा प्रक्रिया अवलंबण्यात येत आहे. अर्थात ही ई-निविदा प्रक्रिया 6 प्रादेशिक विभाग निहाय राबवण्यात येणार आहे. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मनुष्यबळ पुरवणाऱ्या संस्थांकडून राज्य परिवहन महामंडळाला आवश्यक मनुष्यबळ वेळेत उपलब्ध होईल. कंत्राटी पद्धतीने भरती होणाऱ्या चालक व सहाय्यक उमेदवारांना प्रत्येकी 30 हजारांचे मासिक वेतन दिले जाईल. याशिवाय उमेदवारांना एसटीकडून प्रशिक्षणही दिले जाार आहे.

बसेसची वाढती संख्या व त्यासाठी लागणारे मनुष्यबल मिळाल्यानंतर प्रवाशांना अखंडित, सुरक्षित व दर्जेदार बससेवा पुरवणे शक्य होईल, असा विश्वास मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी वव्यक्त केला.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *