Home » ताज्या » वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : आजपासून २४ तास दर्शन सुरू !

वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : आजपासून २४ तास दर्शन सुरू !

पंढरपूर : वृत्तसंस्था

आषाढी यात्रेला वारकऱ्यांची आणि भाविकांची होणारी मोठी गर्दी लक्षात घेता, त्यांना सुलभ व जलद दर्शन मिळावे, म्हणून यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचे २४ तास मुखदर्शन, तर २२.१५ तास पदस्पर्श दर्शन आजपासून (दि.२७) सुरू करण्यात येणार असल्याचे मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.

आषाढी यात्रेला भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता, त्यांना सुलभ व जलद दर्शन मिळावे, म्हणून यात्रा कालावधीत चांगला मुहुर्त व दिवस पाहून श्रींचा पलंग काढून भाविकांना २४ तास दर्शन उपलब्ध करून देण्यात येते. त्यानुसार आज (दि.२७) चांगला दिवस असल्याने विधिवत पूजा करून श्रींचा पलंग काढण्यात आला आहे. विठ्ठलाच्या मूर्तीच्या पाठीशी लोड; तर रुक्मिणी मातेच्या मूर्तीच्या पाठीशी तक्क्या देण्यात आला आहे. त्यामुळे श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचे २४ तास मुखदर्शन, तर २२.१५ तास पदस्पर्श दर्शन सुरू राहणार असल्याचे औसेकर यांनी सांगितले.

श्रींचा पलंग काढल्याने काकडा आरती, पोशाख, धुपारती, शेजारती आदी राजोपचार बंद होवून नित्यपुजा, महानैवेद्य व गंधाक्षता हे राजोपचार सुरू राहतील. दिनांक १६ जुलै (प्रक्षाळपुजा) पर्यंत २४ तास दर्शन उपलब्ध असणार आहे. श्रींचा पलंग काढताना पुजेवेळी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्य शकुंतलाताई नडगिरे, ॲड माधवीताई निगडे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक मनोज श्रोत्री, विभाग प्रमुख संजय कोकीळ, अतुल बक्षी व पौरोहित्य करणारे कर्मचारी उपस्थित होते.

 

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *