Home » महाराष्ट्र » सुप्रिम कॉलनीत ४९ हजारांचा ऐवज लंपास; दोघा सराईतांना अटक

सुप्रिम कॉलनीत ४९ हजारांचा ऐवज लंपास; दोघा सराईतांना अटक

जळगाव : प्रतिनिधी

मुलाच्या लग्नासाठी चाळीसगाव येथे गेलेल्या कुटुंबाच्या बंद घरावर चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना जळगाव शहरातील सुप्रिम कॉलनीत घडली. अज्ञात चोरट्यांनी घराचा कडीकोयंडा तोडून सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ४९ हजार ३०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना दि. १३ डिसेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शरिफ मुराद खाटीक (वय ५२, रा. सुप्रिम कॉलनी) हे आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. त्यांचा मोठा मुलगा अकील खाटीक हा लहानपणापासून चाळीसगाव येथे मामाकडे राहतो. दि. १६ डिसेंबर रोजी त्याचे लग्न असल्याने दि. १३ डिसेंबर रोजी खाटीक कुटुंबीय लग्नासाठी चाळीसगावला गेले होते. याच संधीचा फायदा घेत मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला.

घरातील कपाटाचे लॉकर फोडून चोरट्यांनी ३६ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व १३ हजार ३०० रुपयांचे चांदीचे दागिने असा ऐवज चोरून नेला. दुसऱ्या दिवशी सकाळी शेजारी राहणारे जुनेद शरिफ खान व इकबाल पटेल यांनी खाटीक कुटुंबीयांना फोन करून घराचा दरवाजा व कुलूप तुटलेले तसेच मागचा दरवाजा अर्धवट उघडा असल्याची माहिती दिली. हे समजताच खाटीक कुटुंबीय तात्काळ घरी परतले. घरात प्रवेश केल्यावर कपाटे उघडी व सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आल्याने चोरी झाल्याची खात्री झाली.

याबाबत दि. १४ डिसेंबर रोजी रात्री एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली असून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ किरण चौधरी करीत आहेत.

दरम्यान, या घरफोडीप्रकरणी पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार शकील शेख ताजुद्दीन शेख उर्फ बंदर (रा. कासमवाडी) व साहील शहा सद्दाम शहा उर्फ काल्या (रा. तांबापुर) यांनीच चोरी केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार उपनिरीक्षक शरद बागल यांच्या नेतृत्वाखालील पथकाने दोघांना कासमवाडी परिसरातून अटक केली असून पुढील कारवाईसाठी त्यांना एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *