मुंबई : वृत्तसंस्था
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यूबाबत सरकारने स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. “हा केवळ अपघात आहे की त्यामागे काही घातपात दडलाय? देशभरात चर्चा सुरू असताना सरकार फक्त दोन ओळींच्या स्पष्टीकरणात बोळवण का करत आहे?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.

उद्यापासून सुरू होणाऱ्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर जोरदार टीका केली. अजित पवारांच्या विमान अपघातावर सविस्तर माहिती देण्यास सरकार टाळाटाळ करत असल्याचा आरोप करत, अधिवेशनाआधी आयोजित पारंपरिक चहापान कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला.
वडेट्टीवार म्हणाले, “सरकारने फक्त इतकेच सांगितले की अपघातावर कोणीही प्रश्न निर्माण करू नये. पण का करू नये? हा अपघात आहे की घातपात, हे स्पष्ट झाले पाहिजे. पारदर्शक चौकशी न झाल्यास संशय वाढणारच.” भाजपच्या जुन्या निवडणूक घोषवाक्याचा संदर्भ देत त्यांनी सरकारवर निशाणा साधला. “भाजप विचारत होते ‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र?’ आज आम्ही विचारतो, महाराष्ट्र आज कुठे आहे? शेतकरी, सामान्य माणूस, तरुण वर्ग सगळेच संकटात सापडले आहेत. राज्य ड्रग्जच्या विळख्यात अडकले आहे,” असा आरोप त्यांनी केला.
राज्यातील कृषी संकटावर बोलताना त्यांनी गंभीर आकडेवारी मांडली. गेल्या एका महिन्यात यवतमाळमध्ये २२ आणि मराठवाड्यात ७६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा दावा त्यांनी केला. “सावकारांच्या कर्जापोटी शेतकऱ्यांना किडनी विकावी लागते, ही राज्यासाठी लाजिरवाणी बाब आहे,” असे ते म्हणाले. मक्याला २४०० रुपये हमीभाव जाहीर असताना शेतकऱ्यांना केवळ १५०० ते १६०० रुपये मिळाल्याचा आरोप करत, सोयाबीन आणि कापूस उत्पादकांचीही मोठी लूट सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.
‘लाडकी बहीण’ योजनेवरूनही त्यांनी सरकारला धारेवर धरले. “दावोसमध्ये ३० लाख कोटींचे करार केल्याचा दावा सरकार करते. एवढी गुंतवणूक येत असेल तर महिलांना १५०० ऐवजी ३००० रुपये का देत नाही?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. राज्यातील सरकारी कामकाजात २५ टक्क्यांपर्यंत कमिशनखोरी सुरू असून सर्व व्यवहार ‘मॅनेज’ केले जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. अर्थसंकल्पीय अधिवेशनात या सर्व मुद्द्यांवर सरकारला जाब विचारला जाईल, असा इशाराही वडेट्टीवार यांनी दिला. राज्याच्या राजकारणात या वक्तव्यांमुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे दिसत आहेत.



