Home » जळगाव » दुचाकी–ट्रॉलाच्या भीषण अपघातात आजोबा व ६ वर्षीय नातवाचा मृत्यू !

दुचाकी–ट्रॉलाच्या भीषण अपघातात आजोबा व ६ वर्षीय नातवाचा मृत्यू !

जळगाव : प्रतिनिधी

नवीन घेतलेल्या कारच्या कागदपत्रांच्या कामासाठी शहरात आलेल्या एका कुटुंबावर काळाने भीषण घाला घातला. जळगाव–पाळधी दरम्यान असलेल्या रिंगणगाव–सावदा बायपास रस्त्यावर दुचाकी आणि ट्रॉलामधील भीषण अपघातात आजोबा आणि त्यांच्या सहा वर्षांच्या नातवाचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत मृताची पत्नी गंभीर जखमी झाली असून त्यांच्यावर जळगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही हृदयद्रावक घटना रविवारी (२५ जानेवारी) दुपारी सुमारे एक वाजता घडली.

सविस्तर वृत्त असे कि,  एरंडोल तालुक्यातील निपाणी येथील रहिवासी देशमुख चुनीलाल राठोड (वय ५५) यांनी नुकतीच जळगाव येथून नवीन कार खरेदी केली होती. त्या कारच्या कागदपत्रांच्या कामासाठी ते पत्नी बेबीबाई राठोड (वय ५०) आणि नातू परेश दिनेश राठोड (वय ६) यांच्यासह दुचाकी (क्रमांक MH 19 ER 1642) ने जळगाव येथील हुंडाई शोरूममध्ये आले होते. काम आटोपून तिघेही दुचाकीने गावाकडे परतत असताना पाळधी गावाजवळील रिंगणगाव–सावदा बायपास रस्त्यावर समोरून येणाऱ्या भरधाव ट्रॉलाने (क्रमांक MH 05 AM 3248) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेचा जोर इतका भीषण होता की तिघेही रस्त्यावर फेकले गेले आणि गंभीर जखमी झाले.

अपघातानंतर तातडीने जखमींना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. मात्र तपासणीअंती देशमुख राठोड आणि नातू परेश राठोड यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. बेबीबाई राठोड यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी रुग्णालयात धाव घेऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. नातेवाईकांच्या आक्रोशाने रुग्णालय परिसर शोकमय झाला होता. अपघातानंतर पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या ट्रॉलाचालकाला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले असून वाहनासह चालक पाळधी पोलीस स्टेशनच्या ताब्यात आहे. या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. मृत देशमुख राठोड यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सून आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *