Home » जळगाव » हृदयद्रावक : मालगाडीच्या धडकेत २५ वर्षीय तरुण ठार

हृदयद्रावक : मालगाडीच्या धडकेत २५ वर्षीय तरुण ठार

भुसावळ : प्रतिनिधी 

वरणगाव रेल्वे स्टेशन परिसरात मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास घडलेल्या हृदयद्रावक घटनेत येथील कोळी वाड्यातील सागर उर्फ वैभव दिलीप कोळी (वय २५) या तरुणाचा मालवाहू रेल्वेच्या धडकेत जागीच मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, सागर कोळी हा मंगळवारी रात्री सुमारे दीड वाजेच्या सुमारास वरणगाव रेल्वे स्टेशन परिसरात आला होता. त्याचवेळी स्टेशनपासून दादरा परिसराच्या काही अंतरावर त्याला भुसावळकडून येणाऱ्या मालवाहू रेल्वेने जबर धडक दिली. या भीषण अपघातात सागरचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच भुसावळ लाहेमार्ग रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. त्यानंतर कोळी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी भुसावळ येथे पाठवण्यात आला. या प्रकरणी अशोक पुंडलीक कोळी (रा. वरणगाव) यांच्या माहितीवरून भुसावळ लोहमार्ग पोलिसांत आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

या घटनेमुळे कोळी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. विशेष म्हणजे सुमारे ८ ते ९ वर्षांपूर्वी सागरच्या भावाचाही याच ठिकाणी रेल्वे अपघातात मृत्यू झाला होता. रेल्वेने प्रवास करत असताना पाय घसरून तो रेल्वेखाली सापडल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. सागरच्या पश्चात आई-वडील व एक बहिण असा परिवार आहे. सागरच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. सागर हा कष्टाळू, मनमिळावू आणि सर्वांना मदतीला धावून जाणारा तरुण म्हणून परिसरात परिचित होता. त्याच्या अकाली निधनाने वरणगाव परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *