मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील पुढील पाच दिवसांमध्ये पावसाचा जोर वाढणार असून विदर्भासह मध्य महाराष्ट्र व कोकणामध्ये हवामान विभागाच्या वतीने हाय अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यामध्ये पुढील चार दिवसांमध्ये काही भागात पाऊस हजेरी लावू शकतो. हवामान विभागाच्या अंदाजानूसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानूसार १३ ते १८ ऑगस्ट दरम्यान, मध्य महाराष्ट्र, कोकण व विदर्भात पावासाचा जोर वाढणार आहे. यातील कोकणामध्ये बहुतांश ठिकाणी पावासाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याबरोबरीने ठाण्यासह, पुणे, सातारा, अहिल्यानगर, सांगली, सोलापूर व कोल्हापूर या पश्चिम महाराष्ट्र प्रांतात देखील पावसाची शक्यता असून या भागाला देखील हवामान खात्याकडून यलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे.
मराठवाड्यातील लातूर, धाराशिव, बीड या जिल्ह्यांमध्ये देखील आगामी चार दिवसांमध्ये दमदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून दर्शविण्यात आली आहे. बुधवारी यतवमाळ, वर्धा, चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यांना ऑरेंज तर अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, हिंगोली, परभणी, नांदेड, जालना, बीड, अहमदनगर, पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सोलापूर, लातूर, ठाणे, पालघर या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
त्याबरोबरीने गुरुवारी नागपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ या सात जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट हवामन विभागाकडून देण्यात आला आहे. या भागातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
