पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील चर्चेत असलेल्या हनी ट्रॅप प्रकरणात अडकलेला प्रफुल्ल लोढा याच्या अडचणींमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. पुण्यातील बावधन पोलिस ठाण्यात एका ३६ वर्षीय महिलेनं त्याच्याविरोधात बलात्काराची गंभीर तक्रार दाखल केली आहे. ही घटना २७ मे २०२५ रोजी बालेवाडीतील एका नामांकित हॉटेलमध्ये घडल्याची माहिती समोर आली आहे.


या प्रकरणात लोढानं पीडितेच्या पतीला नोकरी देण्याचे आमिष दाखवून तिला हॉटेलमध्ये बोलावले आणि तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या नव्या गुन्ह्याच्या तपासासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कोर्टातून वॉरंट मिळवून आर्थर रोड कारागृहातून लोढाला ताब्यात घेतले असून, आता बावधन पोलिस त्याची चौकशी करत आहेत. प्रफुल्ल लोढावर यापूर्वीही मुंबईतील अंधेरी एमआयडीसी व साकीनाका पोलिस ठाण्यांमध्ये हनी ट्रॅप आणि अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याच्याविरोधातला हा आणखी एक गंभीर आरोप न्यायालयीन प्रक्रियेला नवे वळण देण्याची शक्यता आहे.



