जळगाव : प्रतिनिधी
सुसाइड नोट लिहून हॉटेल चालक आशिष मधुकर फिरके (४८, रा. संत निवृत्तीनगर) यांनी आत्महत्या केल्याप्रकरणात दुसऱ्या दिवशीही कोणाविरुद्ध गुन्हा दाखल झाला नसून, आकस्मिक मृत्यूची नोंद कायम आहे. याप्रकरणी नातेवाइकांनी अद्याप तक्रार दिली नसून, पोलिस तक्रारीची प्रतीक्षा करीत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आशिष फिरके यांनी रौनक हॉटेलमध्ये रविवारी (१४ सप्टेंबर) मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या केली होती. गळफास घेण्यापूर्वी त्यांनी सुसाइड नोट लिहून ती स्टेटसवर ठेवली होती. त्यात त्यांनी जागा मालकाने हॉटेल खाली करून देण्यासाठी तगादा लावला व त्यांच्या मुलाने धमक्याही दिल्याचे नमूद केले आहे. याप्रकरणात मयताच्या नातेवाइकांनी अद्याप तक्रार न दिल्याने मंगळवारी कोणाविरूद्ध गुन्हा दाखल झाला नाही. तक्रार आल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा पेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी दिली



