Home » महाराष्ट्र » “तुमच्याकडे उरले किती?” : शिंदे गटाचा आदित्य ठाकरेंना पलटवार!

“तुमच्याकडे उरले किती?” : शिंदे गटाचा आदित्य ठाकरेंना पलटवार!

नागपूर : वृत्तसंस्था

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील तब्बल २२ आमदार लवकरच दुसरीकडे जाणार असल्याच्या चर्चेने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी या चर्चेला हवा देत शिंदे गटावर निशाणा साधला. मात्र शिंदे गटाने तात्काळ पलटवार करून ठाकरे यांच्या दाव्याचे खंडन केले आहे.

अधिवेशनादरम्यान पत्रकारांनी आदित्य ठाकरे यांना विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाबाबत विचारणा केली. त्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी, “ही पेरलेली बातमी आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका,” असे म्हणत चर्चा फेटाळली. मात्र त्याचवेळी ते म्हणाले, “मी देखील एका गटातील २२ आमदार दुसरीकडे जाण्याची चर्चा ऐकली आहे.”

या एका वाक्यानेच सत्ताधारी महायुतीत खळबळ उडाली. विरोधकांनी यावर जोरदार चर्चा रंगवायला सुरुवात केली. यावर शिंदे गटाकडूनही प्रत्युत्तर देण्यात आले. शिवसेना (शिंदे गट) आमदार नीलेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर टीकेची झोड उठवत, “आदित्य ठाकरे ज्योतिषी आहेत का? आधी स्वतःकडे किती आमदार आहेत ते बघावेत. त्यांचे तर फक्त वीसच उरले आहेत,” असा चिमटा काढला. तसेच, “जिथे ताकद नाही, त्या विषयात बोलू नये. विधायक विषयांवर चर्चा करावी,” असा सल्लाही त्यांनी दिला.

यापूर्वीही शिंदे आणि फडणवीस यांनी नाराजीच्या चर्चांचे खंडन केले असले तरी विरोधकांकडून या मुद्द्यावर सतत कुरघोडी केली जात आहे. २२ आमदारांच्या चर्चेमुळे सत्ताधारी पक्षात पुन्हा एकदा गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *