मुंबई : वृत्तसंस्था
राज्याच्या राजकारणातील ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी आनंद दिघेंचा फोटो शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शेजारी लावण्यावर आक्षेप घेतला होता. यावरून शिवसेना शिंदे गटाचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी ‘संजय राऊत यांना घरात घुसून मारू,’ अशी उघडपणे धमकी दिली होती.

आमदार राजेश मोरे यांच्या या धमकीनंतर आता मोठा वाद निर्माण झाला आहे. या धमकीनंतर संजय राऊत यांच्या भांडूप येथील निवासस्थानी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
यासंदर्भात बोलताना संजय राऊत म्हणाले, ”मी जिथेही जातो तिथे एकटा जातो. माझ्याकडे कोणताही पोलीस बंदोबस्त नाही. मी शिवसेनेचा नेता आहे. मला माहिती आहे, की जय महाराष्ट्राची ताकद काय आहे. हिंमत असले तर येऊन दाखवा, नंतर तुम्ही परत कसे जाता तेच बघतो,” असं प्रत्युत्तरही संजय राऊत यांनी दिलं.
दरम्यान, संजय राऊत यांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यानंतर शिवसेना शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी ‘जोडे मारो’ आंदोलन केले होतं. डोंबिवलीतील शिंदे गटाच्या आंदोलनात आमदार मोरे सहभागी झाले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी संजय राऊतांना थेट धमकी दिली होती. संजय राऊत यांना त्यांच्या घरात घुसून मारल्याशिवाय शिवसैनिक शांत बसणार नाहीत. तसेच संजय राऊत यांचा एकेरी उल्लेख करत ते राहुल गांधी आणि शरद पवार यांच्याकडून सुपारी घेत असल्याचा देखील आरोप मोरे यांनी केला होता.



