जळगाव : प्रतिनिधी
पाचोरा पोलीसांनी केलेल्या धडक कारवाईत विक्रीसाठी आणलेल्या १८ बेकायदेशीर तलवारींसह एका तरुणास अटक करण्यात आली आहे. या तलवारींची एकूण किंमत अंदाजे ५४,००० रुपये असून काही तलवारी तो आधीच विकल्याचे समोर आले आहे.

ही कारवाई १८ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजता करण्यात आली. पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, सोहेल शेख तय्युब शेख (वय २४, रा. स्मशान भूमी रोड, बाहेरपुरा, पाचोरा) नावाचा तरुण पाचोरा शहरात तलवारी विक्रीसाठी आणणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तत्काळ सापळा रचत संबंधित इसमास ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि लपवून ठेवलेल्या १८ तलवारी पोलिसांना काढून दिल्या. या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गु. रजि. क्र. ४६०/२०२५ नुसार भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ४, २५ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१)(३), १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरु असून तलवारींचा स्रोत व विक्रीचे नेटवर्क शोधण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्री. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अरुण आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, पोउपनिरीक्षक कृष्णा घायाळ, कैलास ठाकूर, व पोलिस कर्मचारी संदिप राजपूत, जितेंद्र पाटील, हरीष परदेशी यांनी केली.



