जळगाव : प्रतिनिधी
महापुराने उभ्या पिकासह शेतजमीन वाहून गेली आणि घरही पडले. या अस्मानी संकटाच्या धसक्याने शिंदाड (ता. पाचोरा) येथील वृद्ध शेतकरी महिलेचा करूण अंत झाल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. विमलबाई प्रभाकर पाटील (७८) असे या वृद्ध शेतकरी महिलेचे नाव आहे.
शिंदाड शिवारातील त्यांच्या शेतात कपाशी, मका पिके जोमदार बहरलेली होती. यावर्षी कर्जफेड होऊन मुलाच्या डोक्यावरील भार हलका होईल, अशी अपेक्षा त्यांना होती. विमलबाई यांच्या पश्चात मुलगा, चार मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. दि. १६ रोजी मध्यरात्री झालेल्या अतिवृष्टी व महापुराने संपूर्ण शेती कपाशी, मक्यासह वाहून गेली. वर्षभराचा हंगाम नष्ट झाला. राहत्या घराची भिंतही पडली. यामुळे आता वर्ष कसं निघणार, या विवंचनेत असलेल्या विमलबाई यांचे शुक्रवारी रात्री अस्मानी संकटाच्या धसक्याने निधन झाले.
