Home » महाराष्ट्र » उद्या संजय राऊतही भाजपमध्ये आले तर नवल नाही : मंत्री महाजनाचे सूचक विधान !

उद्या संजय राऊतही भाजपमध्ये आले तर नवल नाही : मंत्री महाजनाचे सूचक विधान !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे राजकारण तापले असताना, मंत्री गिरीश महाजन यांच्या एका सूचक विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. “आज भाजपवर टीका करणारे अनेक नेते भाजपमध्ये आले आहेत. त्यामुळे उद्या संजय राऊतही भाजपमध्ये आले तर आश्चर्य वाटायला नको,” असे विधान गिरीश महाजन यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे नव्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

गुरुवारी गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये मनसे आणि ठाकरे गटातील अनेक बडे पदाधिकारी भाजपमध्ये दाखल झाले. या पक्षप्रवेशाला भाजपच्या स्थानिक आमदार देवयानी फरांदे आणि त्यांच्या समर्थकांनी तीव्र विरोध केला. विरोधकांनीही या प्रकरणावर भाजपवर टीकेची झोड उठवली. मात्र, गिरीश महाजन यांनी या टीकेकडे फारसे लक्ष देण्याची गरज नसल्याचे सांगत राजकारणातील वास्तव मांडले.

महाजन म्हणाले, “राजकारणात विरोध आणि टीका ही कायमस्वरूपी नसते. आज भाजपमध्ये असणारे अनेक नेते पूर्वी भाजपविरोधात बोलत होते. पण आज तेच नेते भाजपमध्ये आहेत आणि आमदार, मंत्री अशा जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळत आहेत. भाजप हा सत्ताधारी पक्ष असून विविध विचारधारेतील नेते आमच्याकडे येत आहेत. ही बाब पक्षाची ताकद दर्शवणारी आहे.” भाजपवर होत असलेल्या टीकेला उत्तर देताना महाजन यांनी सांगितले की, पक्षाचा विस्तार होत आहे हीच खरी वस्तुस्थिती आहे. त्यामुळे विरोधकांकडून होणाऱ्या आरोपांना फार महत्त्व देण्याची गरज नाही. सध्याच्या राजकारणात काहीही होऊ शकते, अशी परिस्थिती असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, संजय राऊत यांनी नाशिकमध्ये झालेल्या पक्षप्रवेशावरून भाजप आणि गिरीश महाजन यांच्यावर सडकून टीका केली होती. “जे आमच्याकडून किंवा मनसेतून गेले आहेत ते भटकेच आहेत. गिरीश महाजन स्वतःला बाहुबली समजतात, पण त्यांनाही नगरपालिकेत फटका बसला आहे. त्यांची पत्नी निवडून आली असली तरी इतर कारणांमुळे त्यांना राजकीय धक्का बसला आहे,” अशी टीका राऊत यांनी केली होती. तसेच, “भाजप सर्वात मोठा पक्ष आहे. गौतम अदानी सुद्धा भाजपचे सदस्य आहेत. इतर पक्षांचे आमदार, खासदार आणि नेते आपल्या पक्षात घेणे म्हणजे श्रीमंत भिकाऱ्याचे लक्षण आहे,” असेही राऊत म्हणाले होते. या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन यांच्या विधानामुळे भाजप–ठाकरे गटातील वाक्‌युद्ध अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *