जळगाव : प्रतिनिधी
जुन्या जळगाव भागातील तरुण कुढापा चौक परिसरात रविवारी, १५ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास एका घरगुती गॅस सिलिंडरच्या स्फोटाने परिसर हादरून गेला. या भीषण आगीत निलेश शंकर शिरसाट व बापू शंकर शिरसाट यांच्या तीन घरे पूर्णपणे जळून खाक झाली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, प्राथमिक अंदाजानुसार आग सुरू झाली ती शॉर्ट सर्किटमुळे आणि त्यानंतर गॅस सिलिंडरचा मोठा स्फोट झाला. स्फोट इतका भीषण होता की, आगीच्या ज्वाळांनी आजूबाजूच्या घरांनाही कचाट्यात घेतले. घरगुती लाकडी पार्टीशनमुळे आग वेगाने पसरली आणि तीनही घरांचा संपूर्ण संसार जळून खाक झाला. या घटनेत शिरसाट कुटुंबाचे संसारोपयोगी वस्तू, रोख रक्कम, सोन्याचे दागिने आणि महत्त्वाची कागदपत्रे पूर्णपणे नष्ट झाली आहेत. पीडित कुटुंबीयांचे अश्रू थांबवणे अवघड झाले. आगीची भीषणता पाहून स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली, पण आग नियंत्रणाबाहेर होती. घटनेची माहिती मिळताच जळगाव महानगरपालिका अग्निशमन विभागाचे ५ बंब घटनास्थळी दाखल झाले. अरुंद रस्ते आणि आगीच्या तीव्रतेमुळे सुरुवातीला जवानांना अडचणी आल्या, मात्र प्रयत्नांमुळे आग आटोक्यात आणली गेली. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा गंभीर दुखापत झालेली नाही.


