जळगाव : प्रतिनिधी
जळगाव महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेनेची युती जाहीर झाल्यानंतर स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या युतीमुळे अनेक इच्छुक उमेदवारांचा पत्ता कट होणार असल्याची शक्यता निर्माण झाली असून, तिकीटाची अपेक्षा ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, नाराज उमेदवार नव्या आघाडीच्या तयारीत असून, अन्य पक्षातून निवडणूक लढवण्याची चाचपणी सुरू केली आहे.

नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात अन्य पक्षातील नेते व इच्छुकांना पक्षप्रवेश दिल्यामुळे जुन्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. त्याच धर्तीवर निवडणुकीच्या काही महिन्या अगोदर मंत्री महाजन यांच्याच नेतृत्वाखाली जळगावमध्येही विरोधी पक्षातील अनेकांना भाजपा मध्ये प्रवेश दिला. त्यात आता शिवसेनेची युती झाल्यामुळे नाराज असलेला भाजपच्या एक गटात अजून नाराजीचे सावट पसरले आहे. नाशिकप्रमाणे जळगावमध्येही नाराजी उघडपणे व्यक्त केली जात नसली तरी अंतर्गत कलहाचे संकेत स्पष्टपणे जाणवत आहेत.
तिकीट वाटपाचे समीकरण बदलणार
भाजप-शिवसेना युतीमुळे तिकीट वाटपाची समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. ज्यांनी वर्षानुवर्षे पक्षासाठी काम केले, जनतेशी संपर्क ठेवला आणि निवडणुकीची तयारी केली, त्यांना आता तिकीट मिळेल की नाही याची प्रचंड अनिश्चितता आहे. पक्षप्रवेश केलेल्या नव्या चेहऱ्यांना प्राधान्य दिले जाण्याची शक्यता असल्याने जुन्या कार्यकर्त्यांमध्ये असंतोष वाढला आहे.
नाशिक प्रमाणे जळगाव ते ही…
नाशिकमध्ये भाजपने अन्य पक्षातील नेत्यांना मोठ्या प्रमाणात प्रवेश दिला होता. त्याचा परिणाम असा झाला की, जुन्या कार्यकर्त्यांना तिकीट मिळाले नाही आणि नाराजीचा भडका उडाला. जळगावमध्येही तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून नाराजी उघडपणे व्यक्त केली जात नसली तरी गटांतर्गत चर्चा, बैठका आणि रणनीती आखण्याचे काम सुरू असल्याचे सूत्र सांगतात.
नवीन आघाडी त्यांनी पक्ष?
नाराज इच्छुक उमेदवार आता अन्य पक्षांचा पर्याय शोधत आहेत. काहीजण स्वतंत्र उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत, तर काहीजण नव्या आघाडीच्या माध्यमातून आपली राजकीय ताकद दाखवण्याच्या प्रयत्नात आहेत. या हालचालींमुळे भाजप-शिवसेना युतीला अपेक्षित परिणाम साधता येईल का, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
विजयाच्या समीकरण
जळगाव महापालिकेची निवडणूक स्थानिक राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. भाजप-शिवसेनेची युती ही सत्ता स्थिरतेसाठी केली गेली असली तरी अंतर्गत नाराजीमुळे युतीला धोका निर्माण होऊ शकतो. नाराज कार्यकर्ते जर मोठ्या प्रमाणात अन्य पक्षात गेले किंवा स्वतंत्र उमेदवार म्हणून उभे राहिले, तर मतविभाजन होऊन युतीच्या विजयाच्या समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून नाराजी उघडपणे व्यक्त केली जात नसली तरी कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता वाढत आहे. तिकीट वाटपाच्या प्रक्रियेत पारदर्शकता नसेल तर नाराजी आणखी तीव्र होईल, असा अंदाज राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.
नाराजी शांत करण्याचे आव्हान
जळगाव महापालिकेच्या निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीला विजय मिळवण्यासाठी अंतर्गत नाराजी शांत करणे हे सर्वात मोठे आव्हान ठरणार आहे. नाराज उमेदवार नव्या आघाडीची तयारी करत असल्याने आगामी निवडणूक अधिक रंगतदार होणार असून, स्थानिक राजकारणात नवे समीकरणे तयार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.



