Home » जळगाव » जळगाव महापालिका धुरळा… : प्रभाग दोनमध्ये बहुपक्षीय संघर्षाची चाहूल; उमेदवारीनंतर ठरेल विजयाची रणनीती..!

जळगाव महापालिका धुरळा… : प्रभाग दोनमध्ये बहुपक्षीय संघर्षाची चाहूल; उमेदवारीनंतर ठरेल विजयाची रणनीती..!

जळगाव : प्रतिनिधी

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक दोनमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला असून बहुपक्षीय लढतीचे संकेत स्पष्ट दिसू लागले आहेत. २०१८ मध्ये भाजपने चारही जागा जिंकून एकहाती सत्ता मिळवली होती. मात्र यावेळी भाजपसमोर गड टिकवण्याचे मोठे आव्हान उभे आहे. शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गट, एमआयएम तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) या पक्षांकडून उमेदवार उभे राहणार असल्याने प्रभागात चुरशीची लढत रंगणार आहे. उमेदवार निश्चित झाल्यानंतर प्रचार व विजयाची रणनीती आखण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.

पूर्वी या प्रभागात सुरेशदादा जैन यांचा प्रभाव होता. मात्र गेल्या काही वर्षांत भाजप व शिवसेना यांनी येथे आपले वर्चस्व निर्माण केले. सुरेशदादा आता सक्रिय नसल्यामुळे सर्वपक्षीय उमेदवारांना अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे. जातीय समीकरणे, आरक्षणाचा प्रभाव आणि स्थानिक नेत्यांचे निर्णय यावर विजयाचे गणित ठरणार आहे. त्यामुळे प्रभाग दोन हा संपूर्ण महापालिकेत सर्वाधिक चर्चेचा ठरण्याची शक्यता आहे.

भाजप व शिवसेनेत उमेदवारांची चढाओढ
२०१८ मध्ये विजयी ठरलेले भाजपचे नगरसेवक नवनाथ दारकुंडे व किशोर बाविस्कर हे शिंदे गटात गेले आहेत. त्यामुळे भाजपसमोर कांचन सोनवणे व गायत्री शिंदे यांना पुन्हा संधी द्यायची की नवीन चेहऱ्यांना उमेदवारी द्यायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. महायुतीत समन्वय साधला तर भाजप दोन व शिंदे गट दोन जागांवर लढेल. अन्यथा भाजपकडून युवा मोर्चा पदाधिकारी, विश्व हिंदू परिषदेचे महेश चौधरी तसेच भरत कारडीले यांसारख्या इच्छुकांना संधी मिळू शकते.

शिवसेना ठाकरे गटाकडून विजय बांदल यांच्यासह तरुण व निष्ठावंत कार्यकर्त्यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे. आरक्षण सोडतीनुसार ओबीसी व सर्वसाधारण महिलांसाठी जागा राखीव झाल्याने शिंदे गटातील नवनाथ दारकुंडे यांच्या पत्नी जोत्सना दारकुंडे किंवा मुलगी पायल दारकुंडे उमेदवारीस येऊ शकतात. तर किशोर बाविस्कर यांच्या पत्नी उज्वला बाविस्कर एसटी गटातून उमेदवार असू शकतात.

जातीय समीकरण ठरणार निर्णायक
या प्रभागात मराठा समाजाचे सुमारे ८ हजार, कोळी समाजाचे ३,८००, मुस्लीम समाजाचे ३,२०० तर तेली समाज तिसऱ्या क्रमांकावर आहे. याशिवाय कुंभार, गवळी, शिंपी यांसारख्या समाजांचे मतदारही निर्णायक ठरणार आहेत. त्यामुळे मराठा व कोळी समाजातील उमेदवारांना तिकीट मिळण्याची शक्यता स्थानिक नेत्यांकडून व्यक्त केली जात आहे.

बहुपक्षीय आव्हान
भाजप व शिंदे गटातील अंतर्गत स्पर्धा तर आहेच, पण शिवसेना ठाकरे गटाने तरुण चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. एमआयएमकडून मुस्लीम समाजातील प्रभावी उमेदवार उभे राहण्याची शक्यता असून त्यांचा मतदारांवर परिणाम होऊ शकतो. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) देखील उमेदवार देऊन भाजप व महायुतीला कडवे आव्हान देणार आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *