चोर-पोलिसांचा खेळ अन फिर्यादीचा जातोय वेळ….
जळगाव : प्रतिनिधी
गेल्या १० एप्रिल २०२५ रोजी शहरातील महाबळ परिसरातील मायादेवी मंदिराच्या मागील बाजूला अरुंधती अपार्टमेंटमध्ये पत्रकाराच्या घरी भरदिवसा चोरीची घटना घडली होती. यात दुसऱ्या मजल्यावर दरवाज्याचे कुलूप तोडून घरातील कपाटातील ७ ग्राम वजनाची सोन्याची चैन तर ५ भारचे चांदीचे ब्रासलेट व ८५ हजारांची रोकड घेऊन चोरट्यांनी पोबारा केला होता. त्यानंतर सिसिटीव्हीमध्ये चोरटे कैद झाले असले तरी पोलिसांना हे तीन चोरटे सापडण्यासाठी दोन महिने होवून गेले तरी चोर सापडत नसल्याचे माहिती समोर आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, १० एप्रिल २०२५ रोजी मायादेवी मंदिराच्या मागील बाजूला अरुंधती अपार्टमेंटमध्ये पत्रकार के.पी.चव्हाण हे परिवारासह वास्तव्यास असून भरदिवसा घरफोडी करीत चोरट्यांनी लाखोंचा माल लांबविला होता. त्यानंतर लागलीच रामानंद नगर पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर चार ते पाच दिवसात परिसरातील सीसीटीव्ही चेक केले असता. चोरटे आढळून आले होते. मात्र गेल्या दोन महिन्यापासून चोरट्यांचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडे असतांना देखील पोलिसांना हे तीन चोरटे आढळून येत नसल्याने मोठी शंका व्यक्त केली जात आहे.
परराज्यातील चोरट्यांना शहरात धुमाकूळ !
जळगाव शहरातील अनेक ठिकाणी चोरीच्या घटना घडत आहे. या सीसीटीव्हीमध्ये कैद झालेले चोरटे हे बाहेर राज्यातील असल्याचा खुलासा देखील पोलिसांनी केला आहे. मात्र हे चोरटे पोलिसांच्या हाती लागत नाही आहे. या चोरीसह अनेक चोऱ्या होवून देखील पोलिसांकडून अनेक चोरटे पकडले जात नसल्याने चोर आणि पोलिसांच्या खेळामध्ये संशय व्यक्त होणे साहजिकच आहे. तर शहरातील अनेक भागात परराज्यातील चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच आहे. याचा तरी पोलीस तपास करणार का ?
चोर-पोलिसांचा खेळ अन फिर्यादीचा जातोय वेळ….
शहरातील अनेक परिसरात चोरी होणे हे काही विशेष राहिलेले नाही मात्र ज्याच्या घरात चोरी होते, त्यांनी अनेक वर्षापासून मेहनतीने हि रोकड व दागिने बनविलेले असतात. मात्र पोलीस या चोरीचा तपास दोन ते तीन दिवस मोठ्या दिमाखात करीत असतात. मात्र काही वेळेनंतर फिर्यादी पोलीस स्थानकाचे उंबरठे झिजवून चप्पल घासून गेली असते. मात्र तरी देखील पोलीसाना चोर सापडतच नाही. त्यामुळे या चोर-पोलिसांचा खेळ अन फिर्यादीचा वेळ जावू लागला आहे.
