जळगाव : प्रतिनिधी
फेसबुकच्या माध्यमातून ओळख झालेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याने लग्नाचे आमिष दाखवून अनेक वर्ष अत्याचार केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. कोलकाता येथील महिलेच्या फिर्यादीवरून दि. २३ सप्टेंबरला रात्री उशिरा जळगाव शहर पोलिस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपीचे नाव नितीन सपकाळे असून, तो जळगाव पोलिस दलात पोलिस कॉन्स्टेबल पदावर कार्यरत आहे.

फिर्यादीच्या माहितीनुसार, पीडित महिला २०१७ पासून नितीन सपकाळे याच्या संपर्कात होती. त्याने आपण अविवाहित असल्याचे सांगून तिच्याशी मैत्री केली आणि लग्नाचे आश्वासन दिले. यावर विश्वास ठेवून महिलेने अनेकदा जळगावला प्रवास केला. या दरम्यान, नितीनने पीडितेला विविध हॉटेल्समध्ये नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले. २०२० मध्ये पीडित महिलेला नितीनच्या लग्नाबद्दल आणि त्याला मुलगी असल्याचे कळले. नितीनने पत्नीसोबत घटस्फोट घेऊन लग्न करण्याचे आश्वासन देत महिलेला फसवणे सुरूच ठेवले होते. २०२१ ते २०२५ या काळात त्याने वेळोवेळी अत्याचार केले. अखेरीस, २०२५ मध्ये नितीनने तिच्यासोबत लग्न करण्यास नकार दिला. त्यानंतर नितीन आणि त्याच्या कुटुंबीयांनी महिलेला धमकावून एका मंदिरात जबरदस्तीने लग्न लावून दिले आणि नंतर हे लग्नच झाले नसल्याचे सांगून तिला सोडून दिले. या फसवणुकीची जाणीव झाल्यावर पीडित महिलेने वकिलांच्या मदतीने मंगळवार, २३ सप्टेंबर रोजी शहर पोलिसांत तक्रार दाखल केली. संशयित नितीन सपकाळे, त्याची पत्नी, आई यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सपोनि दीपक सुरवळकर करीत आहेत.



