जळगाव : प्रतिनिधी
विषारी द्रव्य प्राशन केल्याने गंभीर अवस्थेत दाखल करण्यात आलेल्या अजय अरुण पाटील (वय २५, रा. हरिविठ्ठलनगर) या तरुणाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना दि. २४ रोजी दुपारच्या सुमारास घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे की, हरिविठ्ठलनगर परिसरात कुटुंबासह वास्तव्यास असलेला अजय पाटील याने दि. २३ रोजी रात्रीच्या सुमारास विषारी औषध प्राशन केले. त्यानंतर तो नशिराबाद रस्त्यावरील गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेजजवळील मोकळ्या जागेत अत्यवस्थ अवस्थेत आढळून आला. याबाबतची माहिती त्याचा भाऊ नितीन पाटील याला मिळताच त्याने तात्काळ अजयला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले.
रुग्णालयात अजयवर उपचार सुरू असताना दि. २४ रोजी दुपारच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या वतीने पुढील तपास सुरू आहे.



