मुंबई : वृत्तसंस्था
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा मुंबईला धडकणार असल्याचा इशारा दिला आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्षात ठेवावे, असा एल्गार देखील त्यांनी केला आहे. मराठा आरक्षण आणि मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्याकांड प्रकरण मनोज जरांगे यांनी चांगलेच लावून धरले आहे. यावरून मनोज जरांगे सातत्याने महायुती सरकारवर टीका करत आहेत.

मनोज जरांगे म्हणाले, एकतर आम्ही जाणार किंवा सरकार जाणार? तुम्ही गोड बोलून तर आमचा काटा काढला. पण आम्ही सुद्धा तुम्हाला खेटू आणि आरक्षण घेऊनच राहू. मी गोडीत सांगतो, यापुढे आंदोलन लोकशाहीतच होणार आहे. पण मॅच फायनल असणार आहे. एकतर आम्ही जाणार किंवा सरकार जाणार, असे मनोज जरांगे यांनी म्हटलेआहे .
पुढे म्हणाले, आता यापुढे कमी सांगायचे आणि कमी बोलायचे, पण आता करून दाखवायचे आहे. म्हणजे आता इथून पुढे सरकारची चाल खेळावी लागणार आहे. सरकार सुद्धा निवडून येईपर्यंत काही कळू देत नाही, बोलू देत नाही. फक्त गोड बोलते, आता अचानक आंदोलन करायचे आहे. या भूमिकेशिवाय सरकार ठिकाणावर येणार नाही. सरकार निवडून येईपर्यंत किती पाया पडत होता. किती लाडक्या बहिणींना पैसे दिले. पण आता निकष लावून लाडक्या बहिणींची संख्या कमी करत आहे. सरकार गोरगरिबांना कळू देत नाही. शेवटी बहीण ही बहीण असते, त्यामुळे तिला आता का योजनेतून बाहेर काढले जात आहे, असाही जरांगे यावेळी म्हणाले.
आता खूप ऊन आहे नाहीतर त्यांना आताच हिसका दाखवला असता. मागच्या वेळी मुंबईला गेलो आणि सुखरूप परत आलो. त्यांना तेव्हाच झटका दाखवला असता. आम्हालाही बघायचे आहे की, मंत्री कुठे राहतो, आमच्या गोरगरीब शेतकऱ्यांनी मुंबई बघावी की नाही? त्यांनाही पाहावी असे वाटते. आमचा मुंबईला जाण्याचा विचार आहे. परंतु मी सध्या काही त्याबद्दल तुम्हाला सांगणार नाही. माझा डाव सांगणार नाही, असे सांगत मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईला जाणार असल्याचा इशारा दिला आहे.
पुढे बोलताना म्हणाले, आता डाव कसे टाकायचे? हे आम्हाला चांगले माहिती आहे. परंतु आरक्षण आम्ही घेणारच आहे. अजून थोडे थांबू, पण तयारी अशी करू की चारही बाजूंनी तुम्हाला जायला रस्ता मिळणार नाही. मुख्यमंत्र्यांनी हे लक्षात ठेवावे, असा एल्गार मनोज जरांगे पाटील यांनी केला. तसेच यापुढे कमी सांगायचे आणि कमी बोलायचे, आता करून दाखवायचे आहे. इथून पुढे सरकारची चाल खेळावी लागणार आहे. सरकार निवडून येईपर्यंत काही कळू देत नाही, बोलू देत नाही. फक्त गोड बोलते. आता अचानक आंदोलन करायचे. या भूमिकेशिवाय सरकार ठिकाणावर येणार नाही, अशी टीका मनोज जरांगे यांनी केली.



