जळगाव : प्रतिनिधी
जामनेर तालुक्यातील पळासखेडा येथील प्रकाशचंद जैन बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष राजकुमार प्रकाशचंद कावडिया (५७, रा. जामनेर) यांचा मोबाइल हाती लागलेला नाही. यू-ट्यूबवर पाहून विष घेतले असल्याचे त्यांनी डॉक्टरांना सांगितले तसेच त्यांनी त्यांच्या मित्राला कॉलही केला. त्यामुळे मोबाइल नेमका गेला कोठे? असे प्रश्न निर्माण होत आहे. त्यात एकीकडे त्यांनी विष प्राशन केल्याचे डॉक्टरांचे म्हणणे असून त्यांचे कुटुंबीय त्याचा इन्कार करीत आहे. त्यामुळे मोबाइल हाती लागल्यानंतर तपासाला खरी दिशा मिळू शकणार आहे.

बनावट कागदपत्रे वापरून शैक्षणिक संस्थेच्या इमारतीचे बांधकाम केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले राजकुमार कावडिया यांचा सोमवारी (दि. १०) जळगावात संशयास्पद मृत्यू झाला. राजकुमार कावडिया हे मेहरुण तलाव परिसरात फिरायला गेल्यानंतर त्यांनी त्यांच्या मित्राला कॉल केला. याशिवाय सर्वांत महत्त्वाचे म्हणजे रुग्णालयात दाखल केल्यानंतर ‘आपण यू-ट्यूबवर पाहून विष घेतले आहे’, असे डॉक्टरांना सांगितले, असे डॉक्टरांनीच माध्यमाशी बोलताना सांगितले. कॉल करणे मोबाइलशिवाय शक्य नाही, तरीदेखील काही नातेवाइकांनी कावडिया हे मोबाइल वापरत नसल्याचे पोलिसांना सांगितले, तर त्यांचा मोबाइल हाती लागला नसल्याचे काहीजणांचे म्हणणे आहे. कावडिया जर मोबाइल वापरत नव्हते तर कॉल कशावरून केला व यू ट्यूब कशावर पाहिले, असेही प्रश्न निर्माण होत आहे. दुसरी बाब म्हणजे त्यांचा मोबाइल हाती लागत नसल्याचे सांगितले जात असले तरी सुरू असलेल्या चर्चेप्रमाणे त्यात मृत्युपूर्वीचे व्हिडीओ तर नसावे? अशीही शंका उपस्थित केली जात आहे. त्यामुळे कावडिया यांचा मोबाइल हाती लागल्यानंतर तपासाला दिशा मिळून अनेक तथ्ये समोर येऊ शकतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
कावडिया यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर नातेवाईक, मित्रपरिवार पोहचला आणि पाठोपाठ पोलिसही जबाबासाठी आले. कावडिया यांनी सुसाईड नोट लिहून ठेवण्यासह व्हिडीओदेखील करून ठेवल्याची सकाळपासून जोरदार चर्चा पसरली. मात्र पोलिसांच्या हाती तसे काहीही लागले नाही व नातेवाइकांनीही त्याविषयी माहिती नसल्याचे सांगितले. सुसाइड नोट लिहिली असेल तर ती त्यांच्या खिशात असू शकते व व्हिडीओ केलेला असल्यास तो मोबाइलमध्ये असेल. मात्र त्यांचा मोबाइलच हाती लागलेला नाही. त्यामुळे कावडिया यांचा मोबाईल आणि सुसाईड नोटची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.



