पुणे : वृत्तसंस्था
येथील चाकण परिसरातील वाहतूक कोंडी आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात आज मोठा उद्रेक पाहायला मिळाला. खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली चाकणमधील ग्रामस्थ आणि एमआयडीसीतील कर्मचाऱ्यांनी पीएमआरडीए कार्यालयावर मोर्चा काढला. मात्र, मोर्चेकरांना कार्यालयाच्या आवारात प्रवेश नाकारल्याने अमोल कोल्हे आणि पोलिसांमध्ये जोरदार बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले. मोर्चेकरांना कार्यालयात सोडण्याच्या मुद्द्यावरून अमोल कोल्हे चांगलेच आक्रमक झाले होते.

मुंबईनंतर आता पुण्यातील वाहतूक ही मोठी समस्या बनली आहे. सणावाराच्या काळात चाकण परिसरात वाहनांची प्रचंड गर्दी होते, त्यामुळे प्रवासी, कामगार आणि स्थानिक नागरिक दररोज कोंडीत अडकतात. वाहतूक कोंडी, रस्त्यांची दयनीय अवस्था आणि पोलिसांचा शिथिल प्रतिसाद या तक्रारींना वाचा फोडण्यासाठी चाकणकरांनी आज मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरत प्रशासनाविरोधात आवाज उठवला.
मोर्चा पीएमआरडीए कार्यालयासमोर पोहोचल्यावर पोलिसांनी प्रवेशबंदी लावल्याने परिस्थिती चिघळली. यावेळी खासदार अमोल कोल्हे आणि पोलिस अधिकाऱ्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. कुठला नियम लागतो, शांततेत आम्ही मोर्चा इथपर्यंत आणला आहे. आम्हाला कार्यालयातील परिसरात जाऊ द्या, कुठल्या नियमाने आम्हाला आडवता? असे म्हणत अमोल कोल्हेंनी पोलिसांसमोर आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले. एकतर आम्हाला आतमध्ये जाऊ द्या, नाहीतर प्रशासनाला खाली बोलवा, असा तीव्र शब्दात संताप व्यक्त केला.
शेवटी मोर्चेकरांच्या आग्रही भूमिकेमुळे खासदार अमोल कोल्हे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि शिष्टमंडळातील प्रतिनिधींना कार्यालयात प्रवेश देण्यात आला, तर उर्वरित आंदोलकांना पोलिसांनी बाहेरच अडवले होते.
दरम्यान, चाकण परिसरातील अभूतपूर्व वाहतूक कोंडी फोडण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ताफ्यासह पाहणी दौरा केला होता. मात्र, या पाहणीनंतरही परिस्थितीत काहीही बदल झालेला नसल्याने स्थानिक ग्रामस्थ आणि चाकण एमआयडीसीतील कर्मचारी संतप्त झाले आहेत. या संतप्त नागरिकांनी आता थेट अजित पवारांना आव्हान दिले आहे, एकदा विना ताफ्याचा प्रवास वाहतूक कोंडीतून करुन दाखवा, असे आंदोलक म्हणालेत. प्रशासनाकडून केवळ कागदी घोडे नाचवले जात आहेत, अशी टीकाही आंदोलकांनी केली.



