मुंबई : वृत्तसंस्था
राज्याच्या अर्थसंकल्प अधिवेशनाचा आज शेवटचा टप्पा असल्यावर देखील एकंदरीत आतापर्यंत झालेल्या अर्थसंकल्पातील चर्चांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांनी टीका केली आहे. तसेच विधानपरिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा असतानाही महायुतीचा एकही मंत्री सभागृहात हजर नव्हता. त्यावरून एकनाथ खडसे संतापल्याचे पाहायला मिळाले.

अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा सुरू करतानाच एकनाथ खडसे म्हणाले, “अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आठवड्यामधील शेवटचा प्रस्ताव आहे. या महत्त्वाच्या प्रस्तावावेळी चर्चा सुरू असताना सभागृहात एकही मंत्री हजर नाही. शंभूराज देसाई धावतपळत आले, याबद्दल मी अभिनंदन करतो. सरकार किती संवेदनशील आहे, याचा अनुभव आम्ही घेतोय.
या अंतिम आठवडा प्रस्तावामध्ये सारेच विषय असतात, त्यामुळे सर्वसाधारण काही मंत्री तरी उपस्थित राहावे अशी अपेक्षा आहे. पण माहित आहे तुम्हाला खूप काम आहे, रात्रीचं खूप जागरण होतं आणि जागरणामुळे सकाळी उठायला खूप उशीर होतो.”
एकनाथ खडसे संतापलेले पाहून शंभूराज देसाई म्हणाले, विभागातून माहिती मिळवण्यासाठी वेळ होतो. मी वेळेत आलो होतो, लिफ्टमुळे वेळ झाल्याने दोन सेकंद उशीर झाला, असं स्पष्टीकरण शंभुराज देसाईंनी दिलं आहे.
यावर एकनाथ खडसे म्हणाले, सर्व मंत्र्यांचं ब्रिफिंग नसतं. मीही काही काळ मंत्री राहिलो आहे. मीही १५ वर्षे मंत्री होतो. पण जाऊद्या. सरकार किती असंवेदनशील आहे, याचं हे उदाहरण दिसते. राज्य एकाबाजूला आर्थिक दिवाळखोरीत आहे, असं असतानाही राज्यातील आर्थिक घोटाळे थांबलेले नाहीत. परिवहन विभाग, आरोग्य खातं, विविध खात्यांमध्ये मोठे घोटाळे झाले आहेत. हे घोटाळ्यांचं सरकार आहे. ३२ हजार कोटींचे घोटाळे होतात आणि मुख्यमंत्र्यांना त्याचं ज्ञान असतं हे राज्याचं दुर्दैवं आहे”, असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला.
एकनाथ खडसे म्हणाले की, “लोकशाहीमध्ये सभागृहामध्ये विरोधी पक्षाचे महत्व आहे. याठिकाणी संख्याबळ लक्षात न घेता विरोधी पक्षाची नियुक्ती किंवा मान्यता सरकारच्या माध्यमातून देण्याची गरज आहे. आज शेवटचा दिवस आहे अपेक्षा करु या की, आज तरी सरकारच्या माध्यमातून यावर चर्चा होऊन राज्याला नवा विरोधी पक्षनेता मिळेल,” अशी अशा यावेळी एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली.



