मुंबई : वृत्तसंस्था
राज्याच्या राजकारणात बुधवारी (१७ डिसेंबर) घडलेल्या दोन मोठ्या घडामोडींमुळे सत्ताधारी वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे बिनखात्याचे मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या सदनिका प्रकरणात नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा व १० हजार रुपयांचा दंड कायम ठेवला, तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री व भाजप नेते अमित शहा यांची भेट घेतली. या दोन्ही घटनांनंतर “कोकाटेंची विकेट पडली असून मुंडेंचा मंत्रिमंडळात कमबॅक होणार” अशी चर्चा रंगली आहे.

या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. धनंजय मुंडे यांच्या दिल्ली भेटीवर आणि त्यांच्या संभाव्य मंत्रिमंडळ पुनरागमनाच्या चर्चांवर बोलताना राऊत म्हणाले, “अमित शहा हे माणसं तोडण्यात पटाईत आहेत. धनंजय मुंडे मंत्री होतील की नाही हे मी सांगू शकत नाही, पण त्यांना पुन्हा मंत्रीपदी बसवणं देवेंद्र फडणवीस यांना सोपं नाही.”
ज्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप झाले आहेत अशा नेत्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याचे पाप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतील, असे वाटत नसल्याचे भाकीतही राऊतांनी व्यक्त केले. मात्र, याच वेळी त्यांनी एक मोठा दावा करत सत्ताधाऱ्यांमधील अंतर्गत संघर्षाकडे बोट दाखवले. “शिंदे गटाचे असे असंख्य मंत्री आहेत, ज्यांना तात्काळ बडतर्फ केले पाहिजे. पैशांच्या बॅगा, पैसे मोजतानाचे व्हिडीओ, संशयास्पद व्यवहार असे अनेक मुद्दे समोर आहेत. पण देवेंद्र फडणवीस हे टप्प्याटप्प्याने गेम खेळतात आणि शेवटचा घाव हा मिंध्यांवरच घालतील,” असा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केला आहे.
राऊतांच्या या विधानामुळे महायुती सरकारमधील अंतर्गत राजकारण पुन्हा एकदा उघडकीस आले असून, आगामी काळात सत्ताधारी गोटात मोठ्या उलथापालथी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



