गडचिरोली : वृत्तसंस्था
दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत, या क्षुल्लक कारणावरून पतीने पेट्रोल ओतून जाळलेल्या पत्नीचा महिनाभर मृत्यूशी झुंज देताना अखेर मृत्यू झाला. गडचिरोली तालुक्यातील पोर्ला येथे घडलेल्या या संतापजनक घटनेने समाजमन हादरून गेले आहे. प्रियंका सुशील बारसागडे (वय २६) असे मृत विवाहितेचे नाव असून आरोपी पती सुशील बारसागडे याला पोलिसांनी अटक केली आहे.

सुशील बारसागडे हा मजुरी करून उदरनिर्वाह करत होता. सावली तालुक्यातील निलसनी पेडगाव येथील प्रियंका बोदलवार हिच्याशी त्याची ओळख झाली होती. कुटुंबीयांचा विरोध झुगारून दोघांनी २०१८ मध्ये प्रेमविवाह केला. सुरुवातीला संसार सुरळीत सुरू होता. मात्र, सुशीलला दारूचे व्यसन लागल्यानंतर दोघांमध्ये वारंवार वाद होऊ लागले.
१६ डिसेंबर २०२५ रोजी पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास सुशीलने दारू पिण्यासाठी पत्नी प्रियंकाकडे पैसे मागितले. प्रियंकाने नकार दिल्याने संतप्त झालेल्या सुशीलने तिला बेदम मारहाण करत कपाटातील दोन हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. काही वेळाने तो घरी परतला. त्यावेळी प्रियंका स्वयंपाकघरात काम करत असताना रागाच्या भरात सुशीलने तिच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिले.
प्रियंकाच्या आक्रोशाने तिची पाच वर्षांची मुलगी सुप्रिया जोरजोराने रडू लागली. शेजाऱ्यांनी धाव घेतली; मात्र तोपर्यंत प्रियंका ४० ते ५० टक्के भाजली होती. तिला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करून पुढील उपचारासाठी नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. प्रकृती खालावल्याने तिला खासगी रुग्णालयात उपचार देण्यात येत होते.
महिनाभर मृत्यूशी झुंज दिल्यानंतर २० जानेवारी रोजी प्रियंकाचा मृत्यू झाला. उपचारादरम्यान तिने वडील अशोक बोदलवार यांना संपूर्ण घटनाक्रम सांगितला. त्यांच्या फिर्यादीवरून गडचिरोली पोलिसांनी आरोपी पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. न्यायालयाने त्यास पोलिस कोठडी सुनावली आहे.
प्रियंकाला दोन मुली आहेत. मोठी मुलगी सुप्रिया (वय ५ वर्षे) तर धाकटी मुलगी केवळ तीन महिन्यांची आहे. आईचा मृत्यू आणि वडील पोलिस कोठडीत असल्याने दोन्ही चिमुकल्या पोरक्या झाल्या आहेत. वडिलांकडील कुणीही आधार नसल्याने आता मुलींच्या पालनपोषणाची जबाबदारी प्रियंकाच्या वृद्ध आई-वडिलांवर आली आहे. सध्या मोठी मुलगी आजी-आजोबांकडे असून, लहान मुलीला शिशुगृहात ठेवण्यात आले आहे.



