Home » राष्ट्रीय » एलपीजी टँकरची ट्रॅव्हल्स बसला जोरदार धडक : १६ शिक्षक जखमी !

एलपीजी टँकरची ट्रॅव्हल्स बसला जोरदार धडक : १६ शिक्षक जखमी !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतांना आता मुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरी तालुक्यातील बावनदी येथे रविवारी सकाळी सीएनजी वाहून नेणारा टँकर आणि खासगी ट्रॅव्हल्स यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातानंतर टँकरमधून सीएनजीची गळती झाली आणि हवेत पसरलेल्या गॅसला आग लागली. ही आग जवळच्याच एका घरापर्यंत पोहोचली. या आगीत एका म्हशीचा भाजून मृत्यू झाला असून, घराजवळ उभ्या असलेल्या एक रिक्षा आणि दोन दुचाकींचेही मोठे नुकसान झाले आहे. ट्रॅव्हल्समधील काही प्रवासी जखमी झाले असून, त्यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. टँकर मधील उरला सुरला सीएनजी काढून घेण्यासाठी आत्ता वाहतूक थांबवण्यात आली आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरी तालुक्यातील बावनदी येथे रविवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातामुळे एकच खळबळ उडाली. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या सीएनजी टँकरने चिपळूणहून रत्नागिरीकडे येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सला जोरदार धडक दिली. या धडकेनंतर ट्रॅव्हल्सच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि गाडी थेट रस्ता सोडून सुमारे वीस फूट खोल खाली कोसळली.

या दुर्घटनेत ट्रॅव्हल्समधील सर्व प्रवासी जखमी झाले असून, त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. अपघातानंतर टँकरमधील सीएनजी भरलेली टाकी रस्त्याच्या कडेला गटाराजवळ जाऊन पडली. यामुळे मोठ्या प्रमाणात गॅसची गळती होऊ लागली. गळती झालेली सीएनजी झपाट्याने हवेत पसरली आणि परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. काही वेळातच या वायुलाटाला आग लागली आणि ती जवळच्याच घरापर्यंत पोहोचली.

या आगीत एक म्हैस भाजून मृत्युमुखी पडली, तर घराजवळ उभ्या असलेल्या रिक्षा आणि दोन दुचाकी जळून खाक झाल्या. घटनेनंतर स्थानिकांमध्ये मोठी धावपळ उडाली असून, अग्निशमन दल आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. टँकरमधील उरलेली सीएनजी सुरक्षितरित्या बाहेर काढण्यासाठी आणि परिसर सुरक्षित करण्यासाठी वाहतूक तात्पुरती थांबवण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, अपघात ग्रस्त खासगी ट्रॅव्हल्समधून 16 शिक्षक प्रवास करत होते. ते रत्नागिरीत एका प्रशिक्षणासाठी येत होते. या अपघातात ते सर्वजण जखमी झाले आहेत.

 

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *