नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे राज्यपाल डॉ.सी.पी.राधाकृष्णन यांनी उपराष्ट्रपती निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार असलेल्या राधाकृष्णन यांना ४५२ मते मिळाली, तर इंडिया आघाडीचे उमेदवार माजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी यांना ३०० मते मिळाली. एकूण ७६७ मतांपैकी १५ मते अवैध ठरली, तर ७५२ मते वैध ठरली. विजयासाठी ३९४ मतांची गरज होती, जी राधाकृष्णन यांनी सहज पूर्ण केली.

कोण आहेत सीपी राधाकृष्णन?
चंद्रपूरम पोन्नुस्वामी राधाकृष्णन असे त्यांचे पूर्ण नाव असून, त्यांचा जन्म २० ऑक्टोबर १९५७ रोजी तमिळनाडूतील तिरुपूर येथे झाला. त्यांचे वडील सीके पोन्नुसामी आणि आई के. जानकी अम्मल होत्या. त्यांनी तूतीकोरिन येथील व्हीओ चिदंबरम कॉलेजमधून व्यवसाय प्रशासनात पदवी प्राप्त केली. राधाकृष्णन यांना टेबल टेनिस, क्रिकेट, व्हॉलीबॉल आणि लांब पल्ल्याच्या धावण्याची आवड आहे. कॉलेज काळात ते टेबल टेनिसचे चॅम्पियन होते.
राजकीय प्रवास –
राधाकृष्णन यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (आरएसएस) चार दशकांहून अधिक काळाचा संबंध आहे. १९७४ मध्ये ते भारतीय जनसंघाच्या तमिळनाडू राज्य कार्यकारिणीचे सदस्य झाले. १९९६ मध्ये त्यांची तमिळनाडू भाजपचे सचिव म्हणून नियुक्ती झाली. १९९८ आणि १९९९ मध्ये ते कोयंबटूरमधून लोकसभा निवडणुकीत खासदार म्हणून निवडून आले. खासदार असताना त्यांनी कापडावरील संसदीय स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषवले, तसेच सार्वजनिक उपक्रम, वित्त सल्लागार समिती आणि स्टॉक एक्सचेंज घोटाळ्याच्या चौकशीसाठीच्या संसदीय विशेष समितीचे सदस्य होते. २००४-०७ दरम्यान ते तमिळनाडू भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते आणि त्यांनी १९,००० किमीची रथयात्रा काढली होती. त्यांनी झारखंड (२०२३-२४) आणि महाराष्ट्र (जुलै २०२४ पासून) येथे राज्यपाल म्हणून काम केले आहे.
याशिवाय, त्यांनी तेलंगाना आणि पुदुच्चेरीच्या उपराज्यपालपदाची जबाबदारीही सांभाळली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे निकटवर्तीय मानले जाणारे राधाकृष्णन हे दक्षिण भारतात भाजपचा प्रभाव वाढवण्यासाठी महत्त्वाचे नेते मानले जातात.
संपत्तीचा तपशील –
२०१९ च्या आकडेवारीनुसार, सीपी राधाकृष्णन यांची एकूण संपत्ती ६७,११,४०,१६६ रुपये आहे. यामध्ये चल संपत्ती ७,३१,०७,४३६ रुपये आहे. यात खालील गोष्टींचा समावेश आहे:
रोख रक्कम: स्वतःकडे ६,८७,०९० रुपये, पत्नीकडे १८,१५,६५१ रुपये
बँक ठेवी: ६,५३,८०७ रुपये
बॉण्ड्स, डिबेंचर्स, शेअर्स: १,२८,१३,७३१ रुपये
विमा पॉलिसी: १,३६,६७,२३५ रुपये
दागिने: पत्नीकडे १२८४.७१ ग्रॅम सोने (३१,५०,००० रुपये) आणि १५२.२५ कॅरेट हिरे (१,०६,५७,५०० रुपये)
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५
उपराष्ट्रपती निवडणुकीत एनडीएचे उमेदवार राधाकृष्णन आणि इंडिया आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांच्यात ‘दक्षिण वि. दक्षिण’ असा सामना रंगला. राधाकृष्णन यांनी १५२ मतांनी रेड्डी यांचा पराभव केला. एकूण ७८६ खासदारांपैकी ७६७ जणांनी मतदान केले. मतदान सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत झाले, तर मतमोजणी सायंकाळी ६ वाजता सुरू झाली.
एनडीएचे ‘मिशन साउथ’ –
राधाकृष्णन यांच्या विजयाला भाजपने ‘मिशन साउथ’चा भाग म्हटले आहे. तमिळनाडूतील ओबीसी गौंडर-कोंगु वेल्लाला समुदायातील असलेले राधाकृष्णन हे दक्षिण भारतात भाजपचा चेहरा म्हणून ओळखले जातात. त्यांच्या नामांकनावेळी एनडीएच्या सर्व मुख्यमंत्र्यांनी पाठिंबा दर्शवला होता.
मागील निवडणुकीतील आकडेवारी –
२०२२ मध्ये एनडीएचे उमेदवार जगदीप धनखड यांनी ५२८ मतांसह विजय मिळवला होता, तर इंडिया आघाडीच्या मार्गरेट अल्वा यांना १८२ मते मिळाली होती. यंदा राधाकृष्णन यांनी ४५२ मतांसह विजय मिळवत एनडीएची विजयी परंपरा कायम ठेवली.
इतिहासात स्थान –
आतापर्यंत उपराष्ट्रपती निवडणुकीत चार वेळा उमेदवार बिनविरोध निवडून आले. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन (१९५२, १९५७), मोहम्मद हिदायतुल्लाह (१९७९) आणि शंकर दयाल शर्मा (१९८७) यांचा यात समावेश आहे. १९९२ मध्ये डॉ. केआर नारायणन यांनी ७०० मतांसह सर्वात मोठा विजय मिळवला होता. राधाकृष्णन यांचा हा विजयही इतिहासात नोंदवला जाईल.



