Home » महाराष्ट्र » महाविकास आघाडीचा फज्जा : ठाकरे–पवार गट थेट भिडणार

महाविकास आघाडीचा फज्जा : ठाकरे–पवार गट थेट भिडणार

जळगाव : प्रतिनिधी

महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीची पहिलीच बैठक फिस्कटली आणि अखेर शिवसेना (ठाकरे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांचा काडीमोड झाला आहे. दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे सर्व 75 जागांवर उमेदवार उभे करण्याची घोषणा केली असून, या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात थेट आमनेसामने लढत रंगणार आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचा ठराव
प्रभारी नेते जयसिंगराव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत राष्ट्रवादीने स्पष्ट केले की, पक्ष स्वबळावर लढणार आहे. उमेदवारांच्या मुलाखती सुरू असून प्रत्येक जागेवर पक्षाची ताकद दाखवली जाईल, असा इशारा गायकवाड यांनी दिला.

ठाकरे गटाचा पलटवार
शिवसेना (ठाकरे गट) जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील यांनी पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीवर थेट आरोप करत सांगितले की, “जिथे आमचे विद्यमान नगरसेवक आहेत, तिथेही जागा मागण्याचा हट्ट राष्ट्रवादीने धरला. त्यामुळेच बोलणी फिस्कटली. आता आम्ही देखील सर्व जागांवर स्वबळावर लढणार.” आतापर्यंत 200 हून अधिक उमेदवारांच्या मुलाखती पूर्ण झाल्याचे त्यांनी जाहीर केले.

काँग्रेसची स्वतंत्र तयारी
दरम्यान, काँग्रेस पक्षही स्वतंत्र लढतीच्या तयारीत असून, काही समविचारी पक्ष सोबत आल्यास युतीची शक्यता नाकारलेली नाही. शहराध्यक्ष शाम तायडे यांनी दोन दिवसांत मुलाखतींची प्रक्रिया सुरू होणार असल्याचे सांगितले.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *