मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मध्य रेल्वेच्या दिवा ते मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. लोकल आणि पुष्पक एक्सप्रेस एकमेकांना जोरदार घासल्यामुळे लोकलच्या दारात लटकेलेले ८ ते १० प्रवासी धावत्या ट्रेनमधून पटरीवर पडले. दिवा ते मुंब्रा स्थानकांदरम्यान हे प्रवासी खाली पडले.

छत्रपती शिवाजा महाराज टर्मिनलवरून ही एक्स्प्रेस निघाली होती. यात पाच प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून रेल्वेने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे.
दिवा ते मुंब्रा या स्थानकादरम्यान आज सकाळी ९ ते ९.१५ वाजण्याच्या दरम्यान लोकल आणि एक्सप्रेस एकमेकांना घासल्याचे समोर आले आहे. कल्याणहून सीएमएमटीसाठी निघालेली ८.३६ वाजताची लोकल दिवा ते मुंब्रा स्थनकादरम्यान दुसऱ्या पटरीवर धावणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसला घासल्याने ही मोठी दुर्घटना घडली. यावेळी मोठा आवाज झाल्याने नागरिकही घाबरले होते.
दरम्यान, आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कामावर जाण्यासाठी मुंबईकर लोकलने निघाले होते. पण गर्दी प्रचंड असल्याने अनेकजण दारात लटकत उभे होते. पण मुंब्रा-दिवा या स्थानकादरम्यान लोकल आणि ट्रेन एकमेकांना घासले. ज्यानंतर लोकलमधून ८ ते १० प्रवासी पटरीवर खाली पडले. यातील ५ जणांचा मृत्यू झाला असून काहींना गंभीर दुखापत झाली आहे. सध्या रेल्वेकडून या घटनेची माहिती घेतली जात आहे.



