Home » महाराष्ट्र » माणिकराव कोकाटेंच्या अडचणी वाढल्या; नाशिक न्यायालयाकडून अटक वॉरंट जारी

माणिकराव कोकाटेंच्या अडचणी वाढल्या; नाशिक न्यायालयाकडून अटक वॉरंट जारी

नाशिक : वृत्तसंस्था

राज्यातील मुख्यमंत्री कोट्यातून सदनिका लाटल्याप्रकरणी अडचणीत आलेले राज्याचे क्रीडामंत्री तथा निफाडचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी वाढल्या असून, त्यांच्या अटकेचे वॉरंट जारी करण्यात आले आहे. नाशिक जिल्हा प्रथम वर्ग न्यायालयाच्या न्यायमूर्ती रुपाली नरवडीया यांनी हा आदेश दिला. या निर्णयामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

या प्रकरणात हस्तक्षेप याचिकाकर्त्या ॲड. अंजली दिघोळे-राठोड यांनी कोकाटे यांच्या अटकेसाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर सुनावणी करत न्यायालयाने अटक वॉरंट काढण्याचे आदेश दिले.

१९९५ साली मुख्यमंत्री कोट्यातून मिळणाऱ्या घरांच्या योजनेत गैरप्रकार करत माणिकराव कोकाटे व त्यांच्या भावांनी चार सदनिका लाटल्याचा आरोप आहे. या प्रकरणात न्यायालयाने यापूर्वी कोकाटे बंधूंना दोषी ठरवत दोन वर्षांचा कारावास व प्रत्येकी १० हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली होती. मात्र शिक्षेला स्थगिती मिळविण्यासाठी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न झाल्याने आता अटक वॉरंट जारी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

या घडामोडींमुळे माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रिपदासह आमदारकीवरही टांगती तलवार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. दोषसिद्धी कायम राहिल्यास लोकप्रतिनिधी कायद्यानुसार त्यांची आमदारकी धोक्यात येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या शिक्षेला स्थगिती मिळविण्यासाठी कोकाटे उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. पुढील काही दिवसांत या प्रकरणावर उच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता असून, संपूर्ण राज्याचे लक्ष या निकालाकडे लागले आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *