Home » महाराष्ट्र » मनोज जरांगे पाटील छत्रपती संभाजीनगरच्या रुग्णालयात दाखल !

मनोज जरांगे पाटील छत्रपती संभाजीनगरच्या रुग्णालयात दाखल !

मुंबई : वृत्तसंस्था

मनोज जरांगे पाटलांचे आझाद मैदानावरील उपोषणाची यशस्वी सांगता झाल्यानंतर जरांगे पाटील मुंबईहून थेट संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. पुढील दोन दिवस जरांगेंन उपचार घेण्याची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितलं आहे.

मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर निर्णायक आंदोलनाचा निर्धार करीत २९ ऑगस्टपासून आझाद मैदानावर बेमुदत उपोषण सुरू केले होते. या आंदोलनामुळे मुंबईची आणि सरकारचीही अभूतपूर्व कोंडी झाली. अखेर मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याशी मराठा समाजाच्या मागण्यांवर चर्चा करून अंतिम तोडगा काढला. मंगळवारी राज्य सरकारने आठपैकी सहा मागण्या मान्य केल्या. उपसमितीने प्रस्तावित शासन निर्णयांचा मसुदाच सोबत ठेवला होता. त्यावर उपसमिती आणि जरांगे अशी दीर्घ जाहीर चर्चा झाली. जरांगे यांनी काही दुरूस्त्या सुचवल्या, त्या मान्य करत मंत्रिमंडळ उपसमितीने या आंदोलनाची कोंडी फोडली.

हैद्राबाद गॅझेटियरचा जीआर हाती घेत विखे यांच्या हातून लिंबुपाणी घेत जरांगे यांनी उपोषण सोडले. आंदोलनाची सांगता झाल्यानंतर जरांगे संभाजीनगरला रवाना झाले. तेथील गॅलेक्सी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी सांगितलं की, “गेल्या सात दिवसांपासून जरांगेंचे उपोषण सुरू आहे. रूग्णालयात दाखल झाले तेव्हा त्यांना चक्कर येत होती. पोटामध्ये दुखत होतं. त्यांची तब्बेत नाजूक असून उपचार सुरू केले आहेत. बाकीच्या चाचण्या देखील सुरू आहेत.”

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *