जळगाव : प्रतिनिधी
पती कामावर तर मुले शाळेत गेलेली असताना अनिता किरण कोळी (३१, रा. हरिविठ्ठल नगर) या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. मुले संध्याकाळी शाळेतून आले त्यावेळी त्यांना आई गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. ही घटना १२ सप्टेंबर रोजी घडली. या प्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नगरात हरिविठ्ठल राहणाऱ्या अनिता कोळी यांचे पती केबल ऑपरेटर म्हणून काम करतात. या दाम्पत्यास एक मुलगा व एक मुलगी असून शुक्रवारी पती कामासाठी बाहेर गेले व मुले शाळेत गेली होती. त्यावेळी घरी एकट्याच असलेल्या अनिता कोळी यांनी घराच्या मागील खोलीत गळफास घेतला.
संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास मुले घरी आली, त्यावेळी त्यांना आई गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. त्यावेळी मुलांनी आजूबाजूच्या नागरिकांना हा प्रकार सांगितला. नागरिकांनी रामानंद नगर पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर विवाहितेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. या प्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ अजित पाटील करीत आहेत.
अनिता कोळी यांनी आत्महत्या केली नसल्याचे विवाहितेच्या माहेरच्यांचे म्हणणे आहे. तसा तक्रार अर्ज त्यांनी रामानंद नगर पोलिस ठाण्यात दिला असून त्यात घातपाताचा संशय व्यक्त केला. या अर्जानुसार चौकशी केली जात आहे. १० सप्टेंबर रोजी एका विवाहितेने आत्महत्या केल्यानंतर तिच्या वडिलांनी फिर्याद दिल्याने सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल झाला. त्यानंतर १२ सप्टेंबर रोजी पुन्हा एका विवाहितेने आत्महत्या केली. यातही माहेरच्या मंडळींनी संशय व्यक्त केला आहे.



