Home » जळगाव » भरदुपारी विवाहितेने घेतला गळफास : माहेरच्या नातेवाईकांचा सासूसह ननंदेवर आरोप !

भरदुपारी विवाहितेने घेतला गळफास : माहेरच्या नातेवाईकांचा सासूसह ननंदेवर आरोप !

जळगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील किनोद येथील 26 वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आयुष्याची अखेर केल्याची घटना गुरुवारी (१ मे) समोर आली होती. दरम्यान ही आत्महत्या नसून सासू आणि ननंद यांनी तिचा गळा दाबून खून केल्याचा आरोप विवाहितेच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे. गायत्री ज्ञानेश्वर कोळी (वय 26 रा. किनोद ता. जळगाव) असे मयत विवाहितेचे नाव आहे.

सविस्तर वृत्त असे कि, जळगाव तालुक्यातील किनोद गावात गायत्री कोळी या पती, सासू आणि दोन मुलं यांच्यासह वास्तव्याला होत्या. पती भाजीपाला विक्री करतो, तर संसाराला हातभार लावण्यासाठी गायत्री शिवणकाम काम करत होत्या. गुरुवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास विवाहितेने गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवल्याचं सांगण्यात आलं होतं. या घटनेबाबत गायत्रीच्या माहेरच्या मंडळींना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, गायत्रीने आत्महत्या केली नसून तिच्यासोबत घातपात झाल्याचा आरोप तिचा भाऊ सागर कोळी, बहीण प्रियंका कोळी आणि मावशी सुनीता कोळी यांनी केला आहे.

मयत विवाहिता गायत्रीचा भाऊ सागर कोळी यांनी सांगितले की, “गायत्रीला मासिक पाळी आली होती. या काळात तिने स्वयंपाक केला होता, तो स्वयंपाक तिच्या सासू आणि इतरांना चालत नव्हता. यावरून किरकोळ वाद झाला होता. दरम्यान, हा वाद विकोपाला गेला. तिने हा प्रकार वडिलांना देखील सांगितला होता. पण, वडील बाहेरगावी गेले होते. असे असताना तिच्या सासू आणि नणंद यांनी घरी येऊन तिला मारझोड केली आणि गळा दाबून खून केला आणि नंतर तिने जीव दिल्याचा बनाव करत गळ्यात साडी बांधून तिला लटकवून दिले”. असा आरोप केला आहे. दरम्यान, गायत्रीने गळफास घेतल्याचं लक्षात आल्यानंतर तिचा पती, सासू आणि नणंद हे फरार झाले होते. गायत्रीला जळगावच्या जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले. यावेळी तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केल्याचे पाहायला मिळाले.

 

 

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *