Home » जळगाव » जळगावात केमिकल कंपनीला भीषण आग : लाखोंच्या नुकसानीचा अंदाज !

जळगावात केमिकल कंपनीला भीषण आग : लाखोंच्या नुकसानीचा अंदाज !

जळगाव : प्रतिनिधी

जळगाव एमआयडीसी परिसरातील आर. एल. चौफुलीजवळ असलेल्या एन सेक्टरमधील ‘आर्यव्रत’ नावाच्या केमिकल कंपनीला आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे कंपनीतील लाखो रुपयांचे साहित्य व मालमत्ता जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. उशिरापर्यंत आग विझविण्याचे काम युद्धपातळीवर सुरु होते.

मिळालेल्या माहितीनुसार,  या आगीची तीव्रता इतकी भयानक होती की, सुमारे ४ ते ५ किलोमीटर अंतरावरून आगीच्या ज्वाळा आणि धुराचे प्रचंड लोट दिसत होते, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. ही आग नेमकी कशामुळे लागली, याची निश्चित आकडेवारी अद्याप समोर आली नसून, जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले कि , हि केमिकल कंपनी असून आग आटोक्यात आल्यानंतर ती कशी लागली हे समोर येईल . तसेच आमदार राजूमामा भोळे यांनी एमआयडीसी परिसरात आणखी दोनतीन अग्निशामक बंब आणण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी अशी शक्यता वर्तवली जात आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. जळगाव महानगरपालिका, जैन इरिगेशन, वरणगाव, भुसावळ, जामनेर आणि नशिराबाद येथील अग्निशमन दलाचे ८ ते १० बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत आणि त्यांच्या मदतीने आग विझविण्याचे काम अद्याप सुरू आहे.

घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी रोहन घुगे, आमदार राजूमामा भोळे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी व प्रशासकीय यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी आगीच्या परिस्थितीचा आणि सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. दरम्यान, ही घटना पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. या भीषण दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे वृत्त समोर येत आहे, ही दिलासादायक बाब आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *