Home » जळगाव » समर एजन्सीला मध्यरात्री भीषण आग : इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून खाक !

समर एजन्सीला मध्यरात्री भीषण आग : इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून खाक !

जळगाव : प्रतिनिधी

शहरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या दुकानाला मध्यरात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. शिवतीर्थ मैदानासमोर असलेल्या समर एजन्सी या दुकानात अग्नितांडव बघायला मिळाले. ही आग इतकी भयानक होती की संपूर्ण दुकानाच्या सर्व मजल्यांवर काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले. या आगीत दुकानातील संपूर्ण कुलर, फ्रिजसह सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून खाक झाल्या असून, प्राथमिक अंदाजानुसार जवळपास ५० लाखांचे नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शॉर्ट सर्किटमुळे मध्यरात्री ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आगीची तीव्रता एवढी होती की काही वेळातच ती संपूर्ण दुकानभर पसरली. घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट व आगीच्या ज्वाळा दिसत होत्या. ही माहिती मिळताच जळगाव महापालिकेच्या अग्निशमन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

अग्निशमन दलाच्या तब्बल आठ ते दहा बंबांच्या मदतीने आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. या प्रयत्नांना तब्बल चार ते पाच तास लागले. अखेर पहाटे साडेसहा वाजेच्या सुमारास ही आग नियंत्रणात आणण्यात यश आले. या साऱ्या कालावधीत महापालिका, पोलिस प्रशासन आणि स्थानिक नागरिकांनी मदतकार्यात सहभाग घेतला. या आगीत दुकानातील लाखो रुपयांची इलेक्ट्रॉनिक उत्पादने, विशेषतः नवीन कूलर, फ्रिज, पंखे, मिक्सर, ग्राइंडर इत्यादी संपूर्णपणे नष्ट झाली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. दुकानमालकाने शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली असून, आग लागण्यामागील नेमका कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.

 

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *