जामनेर : प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यातील १८ नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीला काहीच दिवस शिल्लक असताना, जामनेर नगरपरिषदेने भाजपच्या खात्यात पहिला मोठा विजय जमा केला आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याने स्थानिक राजकारणात भाजपवरचं वर्चस्व अधोरेखित झाले आहे.

नगराध्यक्षपदासाठी यंदा सर्वसाधारण महिला प्रवर्गाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर अनेक दावे–प्रतिदावे होत होते. मात्र, साधना महाजन यांचा यापूर्वीचा कारभार, त्यांचा अनुभव आणि महाजन कुटुंबाची संघटनक्षमता पाहता भाजपने त्यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवला. निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गट, काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रिंगणात असल्याचे चित्र होते. तथापि, आज (२० नोव्हेंबर) या तिन्ही पक्षांच्या उमेदवारांनी अनपेक्षितपणे उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे साधना महाजन यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आणि जामनेरमध्ये भाजपकडून जल्लोष सुरू झाला.
या निवडीसह जामनेर नगरपालिका जळगाव जिल्ह्यात बिनविरोध नगराध्यक्ष निवडणारी पहिली नगरपालिका ठरली आहे. यापूर्वी उज्वला दीपक तायडे, किलुबाई शेवाळे, सपना रवींद्र झाल्टे, संध्या जितेंद्र पाटील आणि नानाभाऊ बाविस्कर हे पाच उमेदवारही बिनविरोध निवडून आले आहेत. जामनेर नगरपरिषदेत भाजपने आघाडी कायम ठेवत 27 पैकी 5 जागा बिनविरोध मिळवल्या असून, महाजन यांच्या बालेकिल्ल्यात पुन्हा एकदा पक्षाची ताकद सिद्ध झाल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.



