Home » राष्ट्रीय » …मंत्र्यांनी संयम राखूनच बोलले पाहिजे ; मुख्यमंत्री फडणवीस !

…मंत्र्यांनी संयम राखूनच बोलले पाहिजे ;  मुख्यमंत्री फडणवीस !

मुंबई  :  वृत्तसंस्था

राज्यात औरंगजेबाच्या कबरीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण रंगले असून याच दरम्यान, नागपूरमध्ये दंगलीची घटना घडली. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तीव्र टीका होत आहे. त्यावर भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात येत आहे. अशात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी विविध प्रश्नांवर दिलखुलासपणे उत्तरे दिली आहेत.

या मुलाखतीमध्ये एका प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अटल बिहारी वाजपेयींचा दाखला देत मंत्री नीतेश राणे यांना संयम बाळगण्याचा सल्ला दिला आहे. तुम्ही मंत्री आहात, त्यामुळे तुम्ही ज्या ठिकाणी बोलता, तेव्हा संयम राखूनच बोलले पाहिजे, असे फडणवीस म्हणाले. लोकमत वृत्तसंस्थेच्या एका पुरस्कार सोहळ्यात दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

नागपूरमध्ये दंगल उसळल्यानंतर सरकारमधील काही मंत्री चिथावणीखोर विधाने करत असल्याबाबतचा आरोप विरोधकांनी केला. मंत्र्यांच्या या विधानांवर मुख्यमंत्र्यांनी अंकुश लावावा, अशी मागणी होत आहे. यावर प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, जेव्हा आपण मंत्री असतो तेव्हा संयमानेच बोलले पाहिजे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी राजधर्माचे पालन करण्याबाबत विधान केले होते. त्यामुळे आपले विचार, आपल्या आवडी-निवडी या बाजूला ठेवल्या पाहिजेत. आपण संविधानाची शपथ घेतलेली आहे. संविधानाने आपल्याला कुणाही बरोबर अन्याय न करता वागण्याची जबाबदारी टाकली आहे. मंत्र्यांनी बोलत असताना संयम बाळगला पाहिजे. आपल्या बोलण्याने कुठेही तेढ निर्माण होणार नाही, हा प्रयत्न केला पाहिजे. कधी कधी तरूण मंत्री बोलून जातात. अशावेळी मी त्यांच्याशी संवाद साधतो त्यांना समजावून सांगतो. मंत्री असल्यामुळे संयम बाळगूनच बोलले पाहिजे.

जयंत पाटील यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबाबतही देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे दोन-दोन वाक्यात तुम्ही कसे वर्णन कराल? असा प्रश्न जयंत पाटलांनी विचारला. यावर देवेंद्र फडणवीस यांनी एका वाक्यात उत्तर दिले. फडणवीस म्हणाले की, एका वाक्यात उत्तर देतो. वाईट वाटून घेऊ नका. काही भरवसा नाही. या वाक्यात दोघांची देखील वागण्याची पद्धत आली. काही भरवसा नाही.

 

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *