Home » जळगाव » बळीराम पेठेत अल्पवयीन मुलाला मारहाण !

बळीराम पेठेत अल्पवयीन मुलाला मारहाण !

जळगाव : प्रतिनिधी

शहरातील बळीराम पेठ परिसरात अल्पवयीन मुलांच्या टोळक्याने रस्त्याने जात असलेल्या मोहम्मद आदिल मजील अन्सारी (वय १५, रा. कांचन नगर) याच्यावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री घडली. कोणतेही कारण नसताना आदिलला अडवून सायकलवरून खाली ओढत त्याच्यावर लाथाबुक्क्यांनी व दगडांनी बेदम मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात आदिलच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, घटनेला दोन दिवस उलटूनही पोलिसांकडून अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार,  कांचननगर भागात वास्तव्यास असलेला आदिल मंगळवार दि. १६ रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास बळीराम पेठेतून घरी जात होता. यावेळी काही अल्पवयीन मुलांच्या टोळक्याने त्याला रस्त्यात अडवले. त्याला सायकलवरून खाली ओढून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. यानंतर दगडांनी त्याच्या चेहऱ्यावर वार करत गंभीर जखमी करण्यात आले. जखमी अवस्थेत आदिलला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

घटनेनंतर रुग्णालयातील डॉक्टरांनी शहर पोलीस ठाण्याला घटनेची माहिती दिली. त्यानुसार संबंधित पोलीस कर्मचारी रुग्णालयात दाखलही झाला. मात्र, चेहऱ्याला गंभीर दुखापत झाल्याने आदिल बोलण्याच्या स्थितीत नसल्याने त्याचा जबाब नोंदवता आला नाही. असे असतानाही, दोन दिवस उलटूनही या प्रकरणी पोलिसांकडे कोणतीही अधिकृत नोंद झालेली नाही.

सध्या शहरात गुन्हेगारी वाढत असून अल्पवयीन मुलांच्या टोळ्यांच्या माध्यमातून गुन्हे घडवून आणले जात असल्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची चर्चा आहे. सदरची घटना देखील याच प्रकारची असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. तसेच, संबंधित टोळीकडून धमक्या मिळत असल्यामुळे जखमी मुलाच्या नातेवाईकांकडून तक्रार देण्यास टाळाटाळ केली जात असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *