Home » Uncategorized » ठाकरे बंधूंची युती होताच मनसेला खिंडार : जिल्हाप्रमुख शिंदे गटात दाखल !

ठाकरे बंधूंची युती होताच मनसेला खिंडार : जिल्हाप्रमुख शिंदे गटात दाखल !

मुंबई : वृत्तसंस्था

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची घोषणा होत असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मराठवाड्यात मोठा धक्का बसला आहे. छत्रपती संभाजीनगर येथील मनसेचे जिल्हाप्रमुख सुमित खांबेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. खांबेकर यांच्यासोबत मराठवाड्यातील मनसेच्या आणखी तीन जिल्हाध्यक्षांनीही शिंदे गटाची वाट धरल्याने मनसेच्या संघटनात्मक ताकदीला मोठे खिंडार पडले आहे.

सुमित खांबेकर हे मनसेच्या स्थापनेपासून राज ठाकरे यांच्यासोबत सक्रिय होते. पक्षाच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेत काम करत स्वतःची ओळख निर्माण केली. त्यांच्या कार्याची दखल घेत राज ठाकरे यांनी त्यांच्यावर जिल्हाध्यक्षपदाची महत्त्वाची जबाबदारी सोपवली होती. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत खांबेकर यांनी तत्कालीन औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून मनसेच्या तिकीटावर निवडणूकही लढवली होती.

खांबेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रवेशामुळे छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परिसरात शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. आक्रमक कार्यकर्त्यांची फळी सोबत आल्याने आगामी निवडणुकांमध्ये शिंदे गटाला याचा फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली असताना मनसेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. ऐन निवडणुकीपूर्वीच जिल्हाप्रमुखाने पक्ष सोडल्याने मनसेची शहरातील संघटनात्मक बांधणी कमकुवत होण्याची शक्यता आहे. आता राज ठाकरे संभाजीनगरमध्ये कोणत्या नव्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सुमित खांबेकर यांच्याबाबत यापूर्वीही वाद निर्माण झाले होते. सुमारे ११ वर्षांपूर्वी त्यांच्या कंपनीतून खाम नदीत विषारी द्रव्ये सोडल्याचा आरोप झाला होता. त्यावेळी राज ठाकरे यांनी खांबेकर यांची पक्षातून हकालपट्टी करत कठोर शब्दांत निषेध केला होता. मात्र, पंधरा दिवसांतच हा राजकीय डाव असल्याचे सांगत राज ठाकरे यांनी खांबेकर यांना पुन्हा पक्षात घेऊन शहराध्यक्ष पद दिले होते. आता मात्र खांबेकर यांनी मनसेला रामराम ठोकल्याने मराठवाड्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *