Home » राष्ट्रीय » मनसे नेत्याच्या मुलाचा दारू पिऊन राडा : अर्धनग्न अवस्थेत महिलेला शिवीगाळ !

मनसे नेत्याच्या मुलाचा दारू पिऊन राडा : अर्धनग्न अवस्थेत महिलेला शिवीगाळ !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील मुंबईच्या अंधेरी परिसरात मनसे नेत्याच्या मुलाने दारू पिऊन एका कारला धडक दिली. ज्या गाडीला धडक दिली ती गाडी होती सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर राजश्री मोरेची. या अपघातानंतर राजश्रीने एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. यात मनसे नेत्याचा मुलगा राहील शेख हा अर्धनग्न अवस्थेत असल्याचे दिसून आले तसेच त्याने शिवीगाळ देखील केल्याचे दिसून येत आहे.

राजश्री मोरेने पोस्ट केलेल्या व्हिडिओनुसार, मनसे नेते जावेद शेख यांचा मुलगा राहील शेख हा मद्यधुंद अवस्थेत होता. तसेच अपघात झाल्यानंतर शिवीगाळ करत पैसे घे, जा आणि पोलिसांना सांग, मी जावेद शेखचा मुलगा आहे. मग काय होईल ते तुला दिसेल, अशी धमकी राहील शेखने दिली आहे.

संबंधित व्हिडीओमध्ये राहिल घटनास्थळी उपस्थित पोलिस अधिकाऱ्यांशी वाद घालताना दिसतो. तो पोलिसांना सहकार्य करण्यास नकार देत आक्रमक वर्तन करतो. या प्रकरणात राजश्रीने राहिलविरोधात एफआयआर दाखल केला असून, तिच्या सोशल मीडिया पोस्टमधून एफआयआरची प्रतही शेअर करण्यात आली आहे.

राजश्रीने आरोप केला आहे की, राहिल मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत होता आणि वडिलांच्या राजकीय पदाचा वापर करून धमकी देत होता. तसेच, एफआयआर नोंदविल्यानंतर तिला मनसे कार्यकर्त्यांकडून सातत्याने धमक्या मिळत असल्याचेही तिने सांगितले आहे. राजश्रीच्या या व्हिडीओवर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

दरम्यान, याआधीही राजश्री तिच्या एका व्हिडीओमुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली होती. मनसेने मराठी भाषेच्या वापरावर दिलेल्या जोरदार आग्रहावर तिने नाराजी व्यक्त केली होती. इतरांवर भाषा लादण्यापेक्षा स्थानिकांनी स्वतः अधिक मेहनत करावी, असे ती म्हणाली होती. मुंबईतील स्थलांतरितांमुळेच स्थानिक मराठी लोकांची परिस्थिती अधिक खराब होणार नाही, असा दावा करत तिने वाद निर्माण केला होता. या विधानानंतर वर्सोवा परिसरातील मनसे कार्यकर्त्यांनी तिच्याविरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर राजश्रीने जाहीर माफी मागितली आणि संबंधित व्हिडीओ तिच्या सोशल मीडिया हँडलवरून हटवला.

 

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *