Home » महाराष्ट्र » मनसेला धक्का : राज ठाकरे यांचे निकटवर्तीय नेता शिंदे शिवसेनेत दाखल

मनसेला धक्का : राज ठाकरे यांचे निकटवर्तीय नेता शिंदे शिवसेनेत दाखल

मुंबई : वृत्तसंस्था

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) ज्येष्ठ नेते व माजी प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला आहे. मनसेतून बाहेर पडल्यानंतर त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत सुरू असलेल्या सर्व चर्चांना यामुळे पूर्णविराम मिळाला आहे. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, अखेर त्यांनी शिंदे शिवसेनेचा मार्ग स्वीकारला.

प्रकाश महाजन हे मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि पक्षाचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते. मनसेच्या स्थापनेपासून ते पक्षात सक्रिय होते आणि अधिकृत प्रवक्ते म्हणून त्यांनी आक्रमक भूमिका बजावली होती. मात्र, गेल्या काही काळात पक्षातील अंतर्गत मतभेद, कार्यपद्धतीबाबत असलेली नाराजी आणि काही निर्णयांबाबतची असहमती यामुळे ते अस्वस्थ झाले होते. याच पार्श्वभूमीवर त्यांनी १३ सप्टेंबर रोजी मनसेचा राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्यामुळे मनसेला मोठा धक्का बसल्याची चर्चा त्यावेळी राजकीय वर्तुळात होती.

मनसेतून बाहेर पडल्यानंतर महाजन कोणत्या पक्षात जाणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. बुधवारी (२५ डिसेंबर) त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत शिवसेनेत प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर अवघ्या एका दिवसात त्यांचा शिंदे गटात अधिकृत प्रवेश झाला. विशेष म्हणजे, कोणताही मोठा गाजावाजा किंवा जाहीर कार्यक्रम न करता हा प्रवेश अत्यंत शांतपणे पार पडला.

महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर झालेल्या या प्रवेशामुळे राजकीय समीकरणांमध्ये हालचाल निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील युतीची घोषणा झाल्यानंतरही भाजप व शिंदे शिवसेनेत नेते आणि कार्यकर्त्यांचे आगमन सुरूच असल्याचे चित्र आहे. प्रकाश महाजन यांचा प्रवेश हा महायुतीच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात असून, त्याचा आगामी महापालिका निवडणुकांवर काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मनसेतून बाहेर पडताना प्रकाश महाजन यांनी आपली भूमिका स्पष्ट करत, वय वाढत असताना पक्षात काही गोष्टी मनाविरुद्ध घडत असल्याने राजीनामा दिल्याचे सांगितले होते. कोणावरही वैयक्तिक राग नसल्याचे त्यांनी नमूद केले होते. तसेच, आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (RSS) जोडलेले असल्याचे कधीही लपवले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते. आता शिंदे शिवसेनेतील त्यांच्या प्रवेशानंतर राज्याच्या राजकारणात नव्या घडामोडींना वेग आला आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *