जळगाव : प्रतिनिधी
धावत्या रेल्वेसमोर झोकून देत मनीषा सुरेश कावळे (वय २८, रा. नशिराबाद, ता. जळगाव) या विवाहितेने मुलगी गौरी सुरेश कावळे (वय ६) हिच्यासह आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सायंकाळच्या सुमारास भादली रेल्वे पुलाजवळ घडली. या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे गावात शोककळ पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील भवानी नगरात मनीषा कावळे या पती सुरेश आणि दोन मुलींसोबत राहत होत्या. विवाहितेचा पती एमआयडीसीतील एका चटई कंपनीत कामाला आहे. सोमवार दि. २२ सप्टेंबर रोजी दुपारी गावातील एका महिलेकडे तांदूळ घेण्यासाठी जात असल्याचे पतीला सांगून मनीषा या लहान मुलगी गौरीला घेऊन घरातून गेल्या. संध्याकाळपर्यंत मनीषा व मुलगी गौरी परत न आल्याने पतीला चिंता वाटू लागली. त्यामुळे त्यांनी दोघींचा शोध सुरू केला. शोध घेवूनही त्या मिळून न आल्याने अखेर सुरेश कावळे हे घरी परतले. संध्याकाळी उशिरा भादली रेल्वे पुलाजवळ एक महिला लहान मुलीसह रेल्वेखाली आल्याची माहिती नशिराबाद पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिस हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सुरुवातीला अनोळखी म्हणून नोंद केली होती. दुसरीकडे सुरेश कावळे हे पत्नी व मुलीचा शोध घेत असताना त्यांना बोलविले व त्यांनी मृतदेहाची ओळख पटवली.
एकाच वेळी मुलगी व आईने आत्महत्या केल्याने नशिराबाद गावात शोककळा पसरली. आत्महत्येचे नेमके कारण समोर आले नाही. या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेका कमलाकर बागूल करीत आहेत



